कॉंग्रेस,राष्ट्रवादीही सोशल मिडियाच्या आश्रयाला

पुणे – आगामी लोकसभा निवडणुकांत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसनेही सोशल मिडियाच्या वापरावर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजप आणि सेनेने या बाबत अगोदरच आघाडी घेतल्याने या दोन्ही पक्षांनीही सोशल मिडिया हा विषय गंभीरपणे घेतला असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने कार्यकर्ते तसेच नेत्यांसाठीही सोशल मिडीया प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतले आहेत. नुकत्याच पुणे भेटीवर येऊन गेलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपचा या माध्यमातून चाललेला खोटा प्रचार रोखण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांना सोशल मिडीया ट्रेंड करा असा आदेश पुणे काँग्रेसचे अध्यक्ष अभय छाजेड यांना दिला असल्याचे समजते.

छाजेड यांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष दोघांनीही सोशल मिडीयाकडे दुर्लक्ष करणे परवडणारे नसल्याचे सांगितले आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण द्यायला हवे व त्यासाठी आवश्यक ते तंत्रज्ञ नेमले जावेत अशाही सूचना दिल्या आहेत. पक्षाने सोशल मिडीया सेलची उभारणीही केली आहे आणि प्रशिक्षण कॅम्प सुरू केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसनेही पक्ष नेत्यांसाठी नुकतीच कार्यशाळा आयोजित केली होती त्यात फेसबुक, ट्वीटर तसेच ब्लॉग हे प्रभावी माध्यम म्हणून कसे उपयोगात आणायचे याचे प्रशिक्षण दिले गेले असल्याचे राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष आणि राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की अधिकाधिक नागरी युवकांपर्यंत वेगाने पोहोचण्यासाठी हा चागंला मार्ग आहे. राष्ट्रवादीने या प्रशिक्षणासाठी खासगी कंपनीचे सहकार्य घेतले आहे. ही कंपनी पक्षाला मिडीया स्ट्रॅटिजी आखून देणार आहे.

दोन्ही पक्षातील वरीष्ठांना मात्र सोशल मिडिया बाबत फारशी उत्सुकता नसल्याचेही दिसून येत आहे. या नेत्यांच्या मते पारंपारिक फेस टू फेस संवाद हाच प्रचाराचा खरा मार्ग आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. सार्वजनिक सभा आणि दारोदारी प्रचार हाच सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा सन्मान्य मार्ग आहे असे या नेत्यांचे मत आहे.

Leave a Comment