भविष्यात इंधन बचत करणार्या आणि तरीही स्वस्तात मिळणार्या कारना चांगले दिवस असतील हे लक्षात घेऊन अल्ट्रा हाय फ्यूएल इकॉनॉमी आणि अल्ट्रा लो प्राईज असलेली एकमेवाद्वितीय तीन चाकी कार लास वेगास येथील कन्झुमर इलेक्ट्रोनिक्स शो मधील शो स्टॉपर्समध्ये सादर केली गेली आहे. ही कार २०१५ ला बाजारात येणार आहे. इलियो मोटर्सने बनविलेली ही कार एलिओ नावानेच बाजारात आणली जाणार आहे.
या गाडीविषयी सांगताना निर्माता व कंपनीचा संस्थापक पॉल इलिओ सांगतात, ही गाडी हायवेवर एक गॅलन म्हणजे ३.८ लिटर इंधनात १३४ किमीचा टप्पा पार करू शकणार आहे. तिची किंमतही सर्वसामान्यांना परवडणारी म्हणजे ६८०० डॉलर्स इतकी आहे. ही गाडी अन्य कारप्रमाणेच ९.६ सेकंदात १०० मैलाचा वेग घेऊ शकते. ग्रामीण भागात ही गाडी गॅलनला ५० मैलाचे अॅव्हरेज देते.
इलिओ यांनी २००८ साली इलिओ मोटर्सची स्थापना केली आहे. नव्या तीन चाकी गाडीसाठी कोणतेही नवे तंत्रज्ञान वापरले गेलेले नाही. पेट्रोलियम पदार्थाची करावी लागत असलेली आयात देशाची संपत्ती मोठ्या प्रमाणावर खर्च करते आणि ते थांबविले पाहिजे या विचारातून त्यांनी ही कार तयार केली आहे. या कारला पुढच्या बाजूस दोन चाके आहेत तर एक चाक मागे आहे. पुढची जागा चालकाला बसता येईल इतकीच आहे तर मागे प्रवासी बसण्यासाठी जागा आहे. पॉवर स्टीअरिंग, ए.सी. पॉवर विडोज या गाडीला देण्यात आल्या आहेत. आत्तापर्यंत कंपनीला ६००० ऑर्डर मिळाल्या आहेत आणि ही गाडी २०१५च्या सुरवातीस बाजारात येईल असे सांगितले जात आहे.