बोपण्णा–कुरेशी जोडी उपांत्य फेरीत

भारत-पाक एक्स्प्रेस अर्थात रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानचा ऐसाम उल हक कुरेशी जोडीने सिडनी टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. दुसरीकडे मात्र राडेक स्टेपानेकच्या साथीने खेळणा-या अनुभवी लिएण्डर पेसला सलामीच्या धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. तृतीय मानांकित बोपण्णा-कुरेशी जोडीने ट्रॅट ह्य़ू आणि डॉमिनिक इंगलोट जोडीवर मात केली.

रोहन बोपण्णा आणि पाकिस्तानचा ऐसाम उल हक कुरेशी जोडीचा मुकाबला आता अनुभवी ब्रायन बंधूना नमवणाऱ्या ल्युकास रोसोल आणि जाओ सौसा जोडीशी होणार आहे. लिएण्डर पेससाठी मात्र वर्षांची सुरुवात खराब झाली आहे. चेन्नई खुल्या टेनिस स्पर्धेत साथीदार फॅबिओ फॉगनिनीने दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे पेसला खेळताच आले नाही.

भारताचा अनुभवी खेळाडू लिंएडर पेस या स्पर्धेत सलामीच्या लढतीतच पराभूत झाल्याने वर्षांतील पहिल्या ग्रँडस्लॅम अर्थात ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेसाठी पुरेशा सरावाविनाच खेळावे लागणार आहे. ज्युलियन बेनटअू आणि रॉजर जोडीने पेस-स्टेपानेक जोडीवर ६-४, ६-४ असा विजय मिळवला. पहिल्या सेटमध्ये निष्प्रभ ठरलेल्या पेस-स्टेपानेक जोडीने दुस-या सेटमध्ये पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला.

Leave a Comment