घराणेशाही जारी आहे

नामवंत इंग्रजी पत्रकार तवलीन सिंग यांनी आणीबाणी पासून ते सोनिया गांधी पर्यंतच्या काळात दिल्लीत घडलेल्या राजकीय घटनांचा आढावा घेणारे दरबार हे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात सोनिया गांधी यांची १९८० सालची एक आठवण या पुस्तकात आहे. तेव्हा राजीव गांधी यांना राजकारणात पदार्पण करावे लागेल अशी काही स्थिती नव्हती. संजय गांधी फॉर्मात होते. त्या काळात सोनिया गांधी यांना राजकारणाविषयी प्रश्‍न विचारला असता त्या म्हणाल्या होत्या, ‘माझ्या मुलांनी रस्त्यावर उभे राहून भीक मागितली तरी मला चालेल पण मी त्यांना राजकारणात जाऊ देणार नाही.’ आता सोनिया गांधी यांनी तर घराण्याचा लाभ उठवीत सत्तेची फळे चाखलीच पण आपल्या मुलालाही पंतप्रधानपद मिळावे म्हणून त्या कार्यरत आहेत आणि आता ताजी बातमी अशी आहे की, हे पद प्राप्त करणे मुलाला जमले नाही तर ते काम मुलीने करावे म्हणून आता मुलीनेही राजकारण प्रवेशाचे संकेत दिले आहेत. कॉंग्रेसचे नेते उशिरा जागे झाले आहेत पण आता ते जोमाने कामाला लागले आहेत आणि या कामावर आता प्रियंका वड्रा या निगराणी करून सर्वांना मार्गदर्शन करीत आहेत. कालच कॉंग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची तातडीची आणि केवळ निवडणुकीच्या तयारीला वाहिलेली बैठक झाली.

या बैठकीत पक्षात मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, ग्रामीण विकास मंत्री जयराम रमेश, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, आरोग्य मंत्री गुलाम नबी आझाद इत्यादी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून सुट्टी देऊन पक्षाच्या संघटन कार्यास जुंपण्यास येणार आहे. या मंत्र्यांकडे बहुतेक पक्षाच्या सरचिटणीस पदाची सूत्रे येतील आणि दिग्विजयसिंग यांच्यासारखे सध्याचे सचिव या पदातून मुक्त होतील. कॉंग्रेस पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी फार मोठे बदल करावे लागतील याबाबत कॉंग्रेस पक्षामध्ये दुमत नाही. कारण चार राज्यातील निवडणुकांमध्ये पक्षाला जबर फटका बसलेला आहे. चार राज्याचे परिणाम देशभरात होत नाहीत असे कॉंग्रेसचे नेते वरकरणी म्हणत असले तरी आणि त्यात थोडेबहुत तथ्य असले तरी राजस्थान आणि नवी दिल्ली या दोन राज्यात कॉंग्रेसला जबरदस्त फटका बसलेला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम देशभरात होणारच नाही असे खात्रीने सांगता येत नाही. परिणाम होणार नाही असे हे नेते म्हणत असले तरी प्रत्यक्षात त्यांच्या या तयारीवर चार राज्यातल्या निवडणुकीच्या निकालाची छाया पडलेली आहे.

त्या दिशेने या बैठकीत विचारविनिमयही झाला आहे. या बैठकीला प्रियंका वड्रा उपस्थित होत्या. पक्षातील एका गटाने प्रियंका वड्रा यांनी आता पुढाकार घ्यावा, अशी मागणी सातत्याने केलेली आहे. राहुल गांधी यांच्यामध्ये चमकदारपणा नसल्यामुळे ते देशातल्या लोकांना प्रभावित करू शकत नाहीत. मात्र त्यांच्या ऐवजी प्रियंका वड्रा यांच्याकडे नेतृत्व सोपवले तर त्या पक्षात जान आणू शकतील असे या गटाला वाटते. प्रियंका वड्रा यांच्याकडे बघितले की, इंदिरा गांधी यांची आठवण होते, अशीही कॉंग्रेसच्या नेत्यांची भावना आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासूनच पक्षीय नेतृत्वाच्या बाबतीत प्रियंका वड्रा यांना गळ घातली जात होती. कॉंग्रेसचे नेते कितीही एकदिलाने, हमारा नेता राहुल गांधी अशा घोषणा देत असले तरी त्यांच्यापैकी अनेकांच्या मनात राहुल गांधींच्या नेतृत्वाविषयी साशंकता आहे. मात्र तरीही सोनिया गांधी आणि पक्षनेत्यांचा राहुल गांधींनाच घोड्यावर बसविण्याचा इरादा आहे. अशा परिस्थितीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विजय प्राप्त करायचा असेल तर भारतातल्या ८० कोटी मतदारांच्या मनावर राहुल गांधींचे गारूड चालणे आवश्यक तर आहेच, पण आधी असे गारूड चालू शकते असा विश्वास कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मनातच निर्माण करण्याची गरज आहे. कॉंग्रेस पक्षाने एका जपानी कंपनीला राहुल गांधींची प्रतिमा तयार करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे.

या कंपनीने राहुल गांधी यांना तरुणांचे नेते म्हणून जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र आजच्या तरुण पिढीला सोशल मीडियावरून बोलण्याची सवय आहे आणि तरुणांचा नेता म्हणून पुढे आणायचे असेल तर तो नेता तरुणांच्या माध्यमाशी चांगलाच परिचित असला पाहिजे. त्यादृष्टीने विचार करायला सुरुवात केली तेव्हा असे आढळले की, राहुल गांधी या माध्यमाच्या बाबतीत अगदीच अनभिज्ञ आहेत. फेसबुकवर त्यांचे अकाउंट सुद्धा नाही. आता अकाउंट उघडून त्यांना नरेंद्र मोदी यांच्या ३१ लाखावर सदस्य असलेल्या अकाउंटशी स्पर्धा करायची आहे. एवढे होऊनही कॉंग्रेसच्या नेत्यांना राहुल गांधी यांचा प्रभाव पडण्याबाबत शंका येत आहेत म्हणून प्रियंका वड्रा यांचा समावेश कॉंग्रेसच्या वरिष्ठ वर्तुळात केला गेला आहे. त्यांच्या मुळे कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मनात आणि त्या पाठोपाठ भारतीय जनतेच्या मनात पक्षाविषयी आत्मविश्‍वास निर्माण करायचा असेल तर त्याही दृष्टीने काही अडचणी आहेत. प्रियंका वड्रा यांचे राजकारणातले हे पदार्पण फार उशीरा होत आहे. आता केवळ तीन ते चार महिन्यांवर निवडणुका आलेल्या आहेत. एवढ्या अल्पावधीमध्ये त्या भारतातल्या ८० कोटी मतदारांच्या मनाला कितपत मोहिनी घालू शकणार आहेत याविषयी शंका वाटते.

Leave a Comment