संक्रांतीला रंगणार मोदी-केजरीवाल पतंगांची काटाकाटी

इंदौर -मकर संक्रांतीनिमित्त येत्या १४ जानेवारीला होणार्‍या पतंग महोत्सवात यंदा भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आणि दिल्लीचे तख्त काबीज केलेले अरविंद केजरीवाल यांची चित्रे असलेल्या पतंगांना मोठी मागणी आहे. त्यामुळे यंदाच्या महोत्सवात मोदीं आणि केजरीवाल यांच्या पतंगाची काटाकाटी खास आकर्षण ठरणार असल्याचे पतंग व्यावसायिकांकडून सांगितले जात आहे.

पतंग उत्पादकांनीही मोदी आणि केजरीवाल यांची लोकप्रियता आणि लाट लक्षात घेऊन ब्रांड मोदी आणि ब्रांड केजरीवाल यांच्या चित्रांचे पतंग बाजारात आणले आहेत. पाच रूपयांपासून पन्नास रूपयांपर्यंत त्यांच्या किमती आहेत आणि या दोन्हीही पतंगांना चांगलीच मागणी आहे. मोदी यांची हसरी छबी असलेले त्यांच्या चित्राचे बहुतेक पतंग केशरी रंगाचे आहेत तर केजरीवाल यांच्या पतंगावर त्यांची आम आदमीची टोपी घातलेला फोटा छापला गेला आहे.

पतंग उत्पादक हसन सांगतात की दरवर्षीच बड्या नेत्यांचे पतंग बाजारात येत असतात मात्र त्यातही मिडीयात ज्याचे दर्शन सतत घडते त्याची लोकप्रियता अधिक असे गणित बांधून त्यांच्या नावाचे पतंग आणले जातात. गेल्या वर्षी अण्णा हजारे यांनी धूम माजविली होती मात्र यंदा त्यांच्या पतंगांना मागणी नाही.

Leave a Comment