भारतात सहा कोटी मधुमेही

भारतात मधुमेहींची संख्या सहा कोटी १३ लाख असल्याचे केन्द्रीय आरोग्य खात्याने जाहीर केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या एका पाहणीत ही संख्या दिसून आली आहे असे मंत्र्यांनी लोकसभेत प्रश्‍नोत्तराच्या तासाला सांगितले. विशेष म्हणजे या सहा कोटी पेक्षा अधिक संख्येने असलेल्या मधुमेहींमध्ये २० वर्षांवरील लोकांचा समावेश आहे. त्यापेक्षा कमी वयाच्या रुग्णांचा समावेश त्यात करण्यात आलेला नाही. तसा तो केल्यास ही संख्या ङ्गार मोठी होईल असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. या वाढत्या संख्येची कारणेही संघटनेने नमूद केली आहेत. त्यात बैठी कामे, आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, मद्याप्राशन, तंबाखूचा वापर इत्यादी कारणांचा समावेश आहे. भारतातल्या या संख्येला इंटरनॅशनल डायबेटिक असोसिएशननेही दुजोरा दिला आहे. ही संख्या २०११ या वर्षातली आहे.

सरकारने मधुमेह, हृदयविकार, कर्करोग यांच्या प्रतिबंधाचा देशव्यापी कार्यक्रम आखला आहे. पहिल्या स्तरावर तो १०० जिल्ह्यात राबवला जाणार आहे.या कार्यक्रमात जीवन पद्धतीच्या बाबतीत जागृती निर्माण करण्यावर भर दिला जाणार आहे. व ३० वषार्र्ंपेक्षा अधिक वयाच्या प्रत्येकाची सरकारी रुग्णालयात चाचणी करणे हा या कार्यक्रमाचा एक भाग असेल. भारतात औद्योगीकरणाला वेग आला आहे आणि लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या राहणीमानात बदल होत आहेत. वाहनांचा वाढता वापर हे या बदलाचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य आहे.

दैनंदिनीतला नियमितपणा संपला असून खाण्यातील बदलही परिणाम करीत आहेत. मसालेदार आणि गोड पदार्थ खाण्याकडे लोकांचा कल आहे. गेल्या ३० वर्षात देशात साखरेचा वापर किती वाढला आहे याचा अंदाज घेतला म्हणजे हा कल किती वाढला आहे याचा बोध होतो. १९८० साली भारतात ९० लाख टन साखर तयार होत होती आणि तेवढी साखर देशाला पुरत होती. तेव्हा लोकसंख्या ८० कोटी होती. आता लोकसंख्या दीड पटीने वाढली. लोकसंख्येच्या प्रमाणात साखरेचा वापर वाढला असता तर तो दीड कोटी टक व्हायला हवा होता पण आता देशात अडीच कोटी टन साखर तयार होत आहे आणि आपला देशांतर्गत वापरही तेवढाच झाला आहे. याचा अर्थ साखरेेचा दरडोई वापरही दीड पटीने वाढला आहे. ही एक गोष्ट आपल्या आहारातल्या बदलाचे स्वरूप दाखवून देण्यास पुरेशी आहे.

Leave a Comment