.jpg)
मुंबई – लोकसभा निवडणुका एप्रिलमध्ये होणार हे निश्चित झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. राष्ट्रवादीने एक पाऊल पुढे टाकत लोकसभेसाठी उमेदवारांची यादीच तयार केली. त्यामुळे काँग्रेसनंही महाराष्ट्रात चेहरा बदलण्यासाठी हालचाल सुरु केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करण्यात येणार आहे. त्यांची जागा राज्याचे कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जवळपास विखे पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तबही झालं. मात्र विखेंनी प्रदेशाध्यक्षपदासोबत मंत्रीपदही आपल्याकडे असावं असा आग्रह धरला आहे. पण काँग्रेस हायकमांडने विखेंचा आग्रह नाकारला. एक व्यक्ती एक पद या नियमानुसारच प्रदेशाध्यक्षपद मिळेल अशी भूमिका काँग्रेसने घेतली. विखे-पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदासाठी आपली सहमती दर्शवलीय पण मंत्रीपद जाऊ नये अशी इच्छा व्यक्त केली. तर माणिकराव ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार होताच आपल्याला मंत्रीपद देण्यात यावं अशी मागणी केली.
येत्या तीन-चार दिवसात हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत मंगळवारी रात्री मोहन प्रकाश, माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात चर्चा होणार आहे.