आप वादाच्या भोवर्‍यात

देशात लोकसभा निवडणुकीची घाई झाली आहे. विविध राजकीय पक्षांनी आपल्यावर कोणाचा किती परिणाम होईल याचा अंदाज घ्यायला सुरूवात केली आहे. आजवर मोदींचा इफेक्ट जोखला गेला. आता आपची वेळ आली आहे. या पक्षाला दिल्लीत मिळालेल्या यशाने अनेकांना चकित केले आहे. त्याच्या विजयाचा आपापल्या परीने अर्थ लावून त्यापासून आपल्याला काय धडा घेता येईल आणि त्यानुसार आपल्या कार्यक्रमात, धोरणात काय बदल करता येतील यावर अन्य राजकीय पक्षांत विचार विनियम सुरू आहे. निवडणुकीत या प्रत्येक पक्षावर आम आदमी पार्टीचा काही ना काही परिणाम होणार आहे. काही ठिकाणी तो प्रत्यक्ष आहे तर काही ठिकाणी ते अप्रत्यक्ष आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी मात्र आपल्यावर आपचा परिणाम होणार नाही असे म्हटल आहे. कॉंग्रेसचे नेते मोदी बाबत नेहमी असेच म्हणत असतात. मोदींची लाट वगैरे काही नाही. मोदी हा थापाड्या माणूस आहे असे ते आपल्या मनाचे समाधान करून घेत आहेत पण त्यात काही वस्तुस्थिती नाही. मात्र ते या निमित्ताने का होईना पण नमो मंत्र म्हणत असतात. त्यातून मोदींनाच प्रसिद्धी मिळते. आता तीच अवस्था आम आदमी पार्टीबाबत दिसायला लागली आहे. आपल्यावर काहीही परिणाम होणार नाही असे म्हणून का होईना पण पवार आप ला मोठे करीत आहेत.

त्यांनी आपच्या प्रभावाचा इन्कार केला असला तरीही त्यांच्या पक्षात सर्वाधिक भ्रष्ट मंत्री असल्याने त्यांना या नव्या पक्षाचा धोका आहेच. पवारांनी आपची तुलना आसामातल्या आसाम गण परिषदेशी केली. ती बरोबर आहे. आता या पक्षाचा फारसा प्रभाव राहिलेला नाही पण एकेकाळी या पक्षाने कॉंग्रेस सरकारचा दारुण पराभव केला होता हे पवारांना विसरता येणार नाही. आम आदमी पार्टीचा प्रभाव राहो की न राहो पण दोनच दिवसात हा पक्ष तीनदा अडचणीत आला आहे. हे तीन प्रकार पाहिले असता या पक्षाला आपल्या प्रभावाचा टेम्पो सांभाळता येईल की नाही याबाबत शंका वाटत आहेत. या पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रशांत भूषण यांनी काश्मीरबाबत उगाचच विधान केलेे. काश्मीर हा आपल्या देशभक्तीचा विषय झालेला आहे. तिथली सेना काढून घेतली पाहिजे अशी मागणी भूषण यांनी केली. ही मागणी दहशतवाद्यांना अनुकूल असलेल्या संघटना नेहमीच करीत असतात. एकदा तिथले लष्कर काढून घेतले की तिथल्या दहशतवादी शक्तींना रान मोकळे राहणार आहे. एकंदरीत तिथले लष्कर काढून घेण्याची मागणी करणे म्हणजे दहशतवादी शक्तींना मुभा देणे आहे.

प्रशांत भूषण यांच्या या वक्तव्यामुळे वादळ उठले आणि शेवटी त्यांना आपले शब्द मागे घ्यावे लागले. या पक्षाला बसलेला दुसरा झटका तर त्याच्या अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारा होता. आपच्या सरकारची बहुमताची स्थिती तोळामासा आहेे. एखाद्या आमदाराने पाठींबा काढून घेण्याचा इशारा दिला की, सरकार कोसळू शकते. काल शोईब इक्बाल या आमदाराने पक्षाला तसा इशारा दिला. इक्बाल हे जनता दल (यु) पक्षाचे आमदार आहेत. आपचे नेते कुमार विश्‍वास यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावणारी कविता म्हटली आणि इक्बाल यांनी त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. दिलगिरी व्यक्त न केल्यास सरकारचा पाठींबा काढून घेऊन असा इशारा दिला. कुमार विश्‍वास यांनी दिलगिरी व्यक्त करण्यास नकार दिला असता तर हे सरकार काल सायंकाळी पडले असते. म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. सत्तेसाठी तडजोड केली. कुमार विश्‍वास हे राहुल गांधींच्या विरोधात शड्डू ठोकत आहेत. मोदींना आपल्या विरोधात उभे राहण्याचे आव्हान देत आहेत. जणू काय आपण कधीही पराभूत न होणारे कोणी उमेदवार आहोत असा त्यांचा आविर्भाव आहे. आता त्यांच्या या आविर्भावातली हवाच निघून गेली आहे. पक्षाला बसलेला तिसरा फटका म्हणजे या पक्षाचे पाटण्यातले कार्यालय लालूप्रसाद यादव यांच्या सहकार्‍याच्या घरात आहे.

सार्‍या देशाला भ्रष्टाचारापासून मुक्त करायला निघालेल्या आप पार्टीचे कार्यालय भ्रष्टाचारावरून शिक्षा झालेल्या नेत्याच्या पक्षाच्या आमदाराच्या घरात असावे ही मोठी विसंगती काल समोर आली. या आमदारानेही हे कार्यालय भाड्याने दिले आहे आणि वर्षाला केवळ एक रुपया भाडे आकारले आहे. या गोष्टीने पक्षाला मान खाली घालण्याची वेळ आली. अर्थात आम आदमी पार्टीने सर्वाधिक भ्रष्ट ठरवलेल्या कॉंग्रेस पक्षाशी युती करून सरकार स्थापन केले त्याच दिवशी या पक्षाचे भ्रष्टाचार विरोधी अवसान गळाले आहे. त्यांना यापुढे असे धक्के सहन करावे लागणार आहेत. कारण या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते फार मोठया राजकीय पार्श्‍वभूमीतून आलेले नाहीत. त्यातले काही लोक तर अगदीच उथळ आहेत. हे लोक काही तरी बोलून ठेवणार आणि अरविंद केजरीवाल यांना खुलासें करीत बसावे लागणार असे दिसायला लागले आहे. कॉंग्रेसमध्ये तर गेल्या दहा वर्षांपासून हीच स्थिती आहे. जयराम रमेश, मणिशंकर अय्यर, मनिष तिवारी, यांनी वेळोवेळा तर दिग्विजयसिंग यांनी नेहमीच बाष्कळ विधाने करून पक्षाला सतत अडचणीत आणले आहे. जाता जाता पंतप्रधानांनीही तेच काम केले आहे.