महाराष्ट्रात यंदा ४० लाख मतदारांची भर

मुंबई – सर्वाधिक तरूण लोकसंख्या असलेला देश अशी भारताची ओळख होत असतानाच सर्वाधिक तरूण मतदार नोंदविण्याचा मान महाराष्ट्राने नोंदविला आहे. महाराष्ट्रात नव्याने केलेल्या मतदान याद्यांनुसार यंदा प्रथमच ४० लाख नवीन मतदार नोंदले गेले असून ते २०१४ च्या मार्च एप्रिलमध्ये होणार्‍या लोकसभेसाठी आणि आक्टोबरमध्ये होणार्‍या विधानसभेसाठी प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

महाराष्ट्रात मतदार यादीत नांव नोंदविण्यासाठी तरूणांनी जो प्रतिसाद दिला ते पाहता ही राजकीय वातावरण बदलत चालल्याची चिन्हे आहेत असे तज्ञांचे मत आहे. आधुनिक इतिहासात यापूर्वी कधीच नाही इतक्या संख्येने तरूण मतदार यदा नोंदले गेले आहेत. मागच्या वेळच्या मतदारयादीत १८ ते २० लाख नवे मतदार होते ते यंदा ४० लाखांवर गेले आहेत असे निवडणूक अधिकारी निलेश गटणे यांनी सांगितले.

ते म्हणाले निवडणूक आयोगाने तरूणांनी मतदारयादीत नांव नोंदवावे यासाठी राज्यभर सातत्याने अभियान चालविले होते.२५ जानेवारीला नॅशनल व्होटर्स डे साजरा केला जात असून त्यात नव्याने मतदार झालेल्यांना ओळखपत्राचे वाटप केले जाणार आहे. अण्णा हजारे यांनी केलेली जनजागृती तसेच कांही समाजसेवी संस्थांनी मतदार नोंदणीसाठी केलेले प्रयत्नही इतक्या मोठ्या संख्येने तरूणानी नांव नोंदविण्यासाठी कारणीभूत ठरले असल्याचे राजीकीय विश्लेषक सुरेंद्र जोंधळे यांचे म्हणणे आहे.

यंदाच्या निवडणुकांत महाराष्ट्रात मतदारांची संख्या ७ कोटी २९ लाखांवर जाण्याची शक्यता वर्तविली गेली असून अंतिम मतदार याद्यांचे कामही पूर्णत्वास जात असल्याचे समजते.

Leave a Comment