कोल्हापूर – ई गव्हर्नन्सचा वापर महसुली कामकाजात करून पारदर्शकता आणल्याकामी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाला या माध्यमातून फळ मिळाले आहे. केरळमधील चिंतूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा देशात प्रथम क्रमांक आला आहे.
कोल्हापूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आप्पासाहेब धुळाज यांनी 2011 पासून ई गव्हर्नन्सच्या यंत्रणेच्या वापरातून जिल्हाधिकारी कार्यालयाशी 76 मंडल आणि 12 तहसिल, 6 प्रांत कार्यालये जोडली. विद्यमान जिल्हाधिकारी राजाराम माने, तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी धुळाज यांच्या या प्रयत्नांना पाठिंबा दिला होता. चंद्रकांत मुगळी, अशोक कोरी, सतीश दाभाडे यांचे तांत्रिक सहकार्य मिळाले.
केंद्र शासनाच्या एका समितीने काही दिवसांपूर्वी या सर्व प्रायोगिक प्रकल्पांची छाननी केली. सादरीकरणासाठी धुळाज व त्यांच्या सहकार्यांना निमंत्रित करण्यात आले होते. याचा निकाल जाहीर करण्यात आला असून कोल्हापूर जिल्हा दुसरा आला आहे. त्यांनी लातूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले होते.