मीठ कमी खाण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम

माणसाच्या मृत्यूची अनेक कारणे आपण नित्य पहात आहोत. मात्र प्रगत देशांमध्ये उच्च रक्तदाब हे मृत्यूचे सर्वात मोठे कारण असल्याचे लक्षात आले आहे आणि मृत्यूचे किंवा कमी वयातील मृत्यूचे प्रमाण कमी करायचे असेल तर काय करता येईल, यावर सुरू असलेल्या संशोधनातून मीठ कमी खाणे हा एक उपाय असल्याचे लक्षात आले आहे. म्हणून अमेरिकेमध्ये मीठ खाण्याचे प्रमाण कमी करण्याची राष्ट्रीय मोहीम सुरू करण्यात येणार आहे. अशा प्रकारची मोहीम ही आगळीवेगळीच ठरणार आहे. कारण आजवर अशी मोहीम कधी राबवली गेलेली नाही.

अमेरिकन माणसाचे मीठ खाण्याचे सरासरी प्रमाण किती? याचा सविस्तर अभ्यास करूनच ही मोहीम राबवली जात आहे. २०१४ हे वर्ष मीठ घटवा वर्ष म्हणून साजरे करण्याचा अमेरिकी प्रशासनाचा विचार आहे. सॅनङ्ग्रन्सिस्को येथील युनिव्हर्सिटी ऑङ्ग कॅलिङ्गोर्निया या विद्यापीठातल्या अभ्यास कांनी अमेरिकेतला माणूस सरासरी दररोज जेवढे मीठ खातो त्यातून त्याच्या शरीरात ३६०० मिली ग्रॅम सोडियम जाते, असा निष्कर्ष काढला आहे. निरोगी राहण्यासाठी हे प्रमाण निम्म्याहूनही कमी करण्याची गरज आहे. ते दररोज १५०० मिलीग्रॅम एवढे असावे, अशी कल्पना आहे. एवढे प्रमाण कमी करणे ताबडतोबीने शक्य नाही.

किंबहुना ही आदर्श स्थिती साध्य होण्याची दुरान्वयानेही शक्यता नाही. म्हणून हे प्रमाण दर दिवशी २३०० मिलीग्रॅम एवढे कमी करता येईल का, याचा विचार केला जात आहे. कारण २३०० मिलीग्रॅम पेक्षा अधिक सोडियम रोज सेवन केले तर रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. अमेरिकन लोकांची मीठ खाण्याची ही सवय का वाढली आहे? याचा शोध घेतला असता बाजारातून मिळणारे तयार अन्नपदार्थ हे त्याचे मुख्य कारण असल्याचे लक्षात आले. या पदार्थामध्ये मिठाची मात्रा खूप असते. कारण अन्न पदार्थ टिकवण्यासाठी मीठ घातले जाते आणि ते अधिक टिकावे म्हणून मिठाचा जास्त वापर केला जातो. तेव्हा तयार अन्नपदार्थ बाजारात विकणार्‍या कंपन्यांवरच आधी मिठाच्या बाबतीत काही बंधने घालावीत, असा विचार सुरू झाला आहे. अशारितीने मिठाचे प्रमाण कमी झाले तर अमेरिकी जनतेचे आयुर्मान वाढेल, असा तज्ज्ञांचा दावा आहे. सध्या अमेरिकी जनतेचे सरासरी आयुर्मान ८० वर्षे आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment