आप ला घाबरण्याची गरज नाही – उद्धव

मुंबई – दिल्ली येथे सरकार स्थापन करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाची मदत घेणाºया अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (आप) भ्रष्टाचाराविरोधात बोलण्याचा नैतिक अधिकार गमावला असल्याची टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज (सोमवार) केली.

त्याचबरोबर, महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्षास घाबरण्याची कोणतीही गरज नसल्याचे मत ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. “दिल्लीमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी केजरीवाल यांनी कॉंग्रेसची मदत घेतली. आता “झाडु’च्या (आम आदमी पक्षाचे निवडणूक चिन्ह) सहाय्याने भ्रष्टाचार झाडून टाकण्याबद्दल ते बोलत आहेत. केजरीवाल हे दांभिक आहेत,” असे ठाकरे म्हणाले.

यावेळी ठाकरे यांनी दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्ष नेते हर्ष वर्धन यांनी केजरीवाल यांच्या दांभिकतेचा बुरखा फाडल्याचे सांगितले. वर्धन यांनी आम आदमी पक्ष जनतेची कशा प्रकारे फसवणूक करत आहे, हे सविस्तर मांडल्याचे ठाकरे यांनी सांगितले. दिल्लीतील बाटला हाऊस येथे झालेली चकमक ही बनावट असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले होते, असा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला. या चकमकीवेळी तीन दहशतवादी ठार झाले होते; तसेच एक पोलीस अधिकारीही हुतात्मा झाले होते.