मुंबई – राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांच्या विविध संशोधनांना जगासमोर मांडण्याची संधी देणारा ‘टेकफेस्ट’ या तंत्रज्ञान उत्सवाची सुरुवात आयआयटीमध्ये शुक्रवारी झाली. या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी ३५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे.
मुंबईसह देशभरातून आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अमेरिका, रशिया, जर्मनी, ब्रिटन, जपान आदी देशांतील विविध विद्यापीठे आणि संस्थांतील विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध प्रकारचे रोबो, सुपरकार, ४-जीचा आविष्कार आदी आकर्षण ठरले आहेत. अमेरिकेत तयार करण्यात आलेल्या ‘बीना-४८’ हा कोणत्याही विषयावर संवाद साधणारा रोबोही विद्यार्थ्यांसह अनेकांना आकर्षित करत आहे.
जपानमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व कोणत्याही आवाजात आणि गाण्यामधील बॅकग्राउंडला आवाज तयार करणारी ‘री साउंड बॉटल’ ही अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. या बॉटलमध्ये आपण दिलेल्या आवाजाचे संगणकाद्वारे गाण्यात रूपांतर करण्यात येत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी या बॉटलबद्दलची उत्सुकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
तर दक्षिण कोरिया आणि भारतीय संशोधकांच्या मदतीने तयार केलेल्या ‘होवोस’ नावाच्या रोबोने कराटे आणि इतर खेळांच्या पद्धती करून दाखवत दर्शकांना अचंबित करून सोडले. कोलंबिया, स्वित्झर्लंडलड देशांतील विविध प्रकारचे रोबो, घरात सर्व प्रकारची मदत करणारे, सूचना देणारे, आवश्यकता पडल्यास शरीराचा मसाज करणारे रोबोही ‘टेकफेस्ट’मध्ये सादर करण्यात आले.
यामध्ये क्युबी रोबोट, हारविस अराव्ही, जीम बॉल कॅमेरा अशा विविध रोबोला विद्यार्थ्यांनी अधिक पसंती दिली. शेकडो विद्यार्थ्यांनी ‘बीना-४८’शी बोलण्यासाठी आणि त्याबद्दल माहिती घेण्यासाठी मोठी रांग लावली होती. विचारलेल्या प्रश्नांना बीना-४८ योग्य उत्तरे देते हे पाहून विद्यार्थी आश्चर्यचकित झाले होते.
पहिल्याच दिवशी सकाळच्या सत्रात देशातील माजी सनदी अधिकारी किरण बेदी, ‘भारतरत्न’ डॉ. सी. एन. राव, इन्स्टिटयूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इंजिनीयरिंगचे अध्यक्ष जॉर्डन डे यांच्या ज्ञान-तंत्रज्ञान या विषयावरील व्याख्यानालाही विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती.