लेखकांची उर्मी मारू नका- फ. मुं. शिंदे

संत सोपानदेव साहित्य नगरी, सासवड – जोपर्यंत खेडी आहेत तोपर्यंत मला मराठी भाषेची चिंता वाटत नाही. मात्र, मराठीतील उत्तम लेखनासाठी देण्यात येणारे पुरस्कार कमी करून लेखकांची ऊर्मी मारू नका. हवी तर रक्कम कमी करा पण पुरस्कारांची संख्या कमी करू नका, अशी मागणी ८७व्या अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ. मुं. शिंदे यांनी शुक्रवारी येथे केले.

गेल्या वर्षी दोनऐवजी एकच पुरस्कार दिला गेला, ज्या प्रतिभावंतांच्या नावाने पुरस्कार दिले जात होते त्यांच्या नावालाच कात्री लावली गेली, याबद्दल खंत व्यक्त करत फ. मुं. यांनी, बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत मराठी भाषेचा समावेश करण्यात यावा, अशी भूमिकाही त्यांच्या अध्यक्षीय भाषणात मांडली. संमेलनाच्या उद्घाटनसोहळ्यात मावळते अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी अध्यक्षपदाची सूत्रे फ. मुं. यांच्याकडे सोपवताना, साहित्य क्षेत्र म्हणजे रणभूमी असून येथे शब्दांनी लढाई लढायची असते, या भूमिकेचा पुनरुच्चार केला. सामान्य माणसाची घुसमट होत असताना त्यांचे शब्द होण्याचे काम आम्ही करायचे हेच साहित्याचे प्रयोजन आहे, असे ते म्हणाले.

हाच धागा पकडून शिंदे यांनी, सुखाचे अधिष्ठान दु:खच असते. गरीबितूनच दु:खाकडे जाण्याची श्रीमंती प्राप्त होते. त्यामुळे गरिबीची लाज वाटू देऊ नये, असे मत व्यक्त केले. लेखानानेच मला मोठे केले. भाषाशैली आईकडून आणि रसिकतेची देणगी वडिलांकडून मिळाली. कागद कोरा आणि माणूस पाठमोरा वाचणारा माणूसच सकस लेखन करू शकतो. तोच आपल्या अंत:करणाची स्पंदने लेखनातून उमटवू शकतो, असेही त्यांनी सांगितले. आपल्याकडे काळजाचे लेखन करणारेच दीर्घकाळ टिकत असतो. जोपर्यंत तुम्ही अंतर्मुख करणारे लेखन करत नाही तोपर्यंत प्रसिद्ध होऊ शकत नाही, असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीत वाढल्यामुळे माझ्या लेखनातही अंतर्मुखता उमटली आहे, असे सांगत त्यांनी किल्लारी भूकंपानंतर केलेल्या कवितांचा उल्लेख केला. यंदाच्या साहित्य संमेलन निवडणुकीत लोकप्रियता जिंकली, अंतर्मुखता हरली, असा सूर उमटला होता. तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या. पण प्रत्यक्षात अंतर्मुखताच जिंकली होती, हे लक्षात घ्यायला हवे, असेही ते म्हणाले.

सीमाप्रश्नाचाही त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला. कोणतीही भाषा कोणत्याही भाषेचा द्वेष करीत नाही. मग भांडणे कशासाठी, असा सवाल करीत ते म्हणाले, सीमाशाशित प्रदेशातील भाषेबाबत योग्य भूमिका न घेणा-या राजकारण्यांमुळेच हा प्रश्न प्रलंबित आहे. लेखनाच्या अंगाने मी सासवडचे सुपूत्र प्रल्हाद केशव अत्रे यांच्या अंशातीलच आहे असे मी मानतो. या प्रज्ञावंताचे स्मारक मुंबईत व्हावे अशी अपेक्षा करून, या स्मारकासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

Leave a Comment