आपत्तीच्या काळात अतिशय उपयुक्त ठरू शकेल असा एक आगळावेगळा निवारा तुर्कस्तानमधील एका रचनाकाराने तयार केला आहे. हा निवारा म्हणजे फुग्यासारखा फुगणारा तंबू असून तो हवेतून जमिनीवर आणि त्याचबरोबर समुद्रावरही टाकता येतो आणि आपत्तीच्या काळात त्याचा वापर निवारा म्हणून करण्याबरोबरच पूर आलेल्या भागात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी तराफा म्हणूनही करता येतो. तुर्कस्तानमधील आदेम ओनालन या रचनाकाराने लाइफबॉक्स नावाचा हा बहुउपयोगी निवारा तयार केला असून त्याचा आणखी एक उपयोग वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात अन्न साठवता येण्याची सोय असल्याने आपत्तीच्या काळातील धान्य कोठार किंवा स्वयंपाकघर म्हणूनही त्याचा वापर करता येतो.
या लाइफबॉक्सचे तीन प्रकार करण्यात आले असून हवेतून खाली येण्यासाठी (लाइफबॉक्स एअर), जमिनीवर राहण्यासाठी (लाइफबॉक्स लँड) आणि पाण्यातून प्रवास करण्यासाठी (लाइफबॉक्स वॉटर) त्यांचा वापर करता येणार आहे. विमानातून खाली पडत असताना या लाइफबॉक्सच्या बाहेरचे आवरण एखाद्या पॅराशूटप्रमाणे काम करते आणि आतमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत एखाद्या घराप्रमाणे सुरक्षित राहता येते. लाइफबॉक्स वॉटरमध्ये असलेली एक कळ खेचल्यावर त्याचे रूपांतर एका तराफ्यात होऊ लागते व त्यात असलेल्या कार्बन डायऑक्साइडची नळकांडी रबरी फुग्यांमध्ये कार्बन डायऑक्साइड वायू भरू लागतात आणि हा लाइफबॉक्स पाण्यावर तरंगू लागतो.
या लाइफबॉक्समध्ये अन्न साठवण्याची पुरेशी सुविधा असल्याने कोणत्याही संकटाचा सहजगत्या सामना करता येतो. लाइफबॉक्स एकदा उघडल्यानंतर त्यामध्ये चार माणसे पुरेशा अन्नसाठयासहित दोन आठवडे राहू शकतात. लाइफबॉक्सचे वजन जवळपास ७५ किलोग्रॅम इतके असून, ते वाहण्यासाठी दोन माणसांची आवश्यकता असते. हे लाइफबॉक्स बनवण्याची प्रेरणा ओनालन यांना यांच्या आयुष्यात १९९९ मध्ये घडलेल्या घटनेतून मिळाली आहे. १९९९मध्ये तुर्कस्तानमध्ये आलेल्या ७.६ रिश्टर क्षमतेच्या भूकंपामुळे त्यांना काही दिवस ह्यमदत केंद्राह्णमध्ये राहावे लागले होते. या लाइफबॉक्सला जर्मनीमधील रेड डॉट डिझाइन इन्स्टिट्यूटकडून मान्यता देण्यात आली असून, ओनालन यांना लाइफबॉक्सच्या शोधाबद्दल गौरवण्यात आले आहे.