निवासी डॉक्टरांचा संप मागे

मुंबई – मारहाण करणा-या तिन्ही पोलिसांनी समर्पण केल्याचे राज्य सरकारच्या वतीने माहिती दिल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने हा संप तत्काळ मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात काम करणा-या डॉ. प्रशांत पाटील यांना ३१ डिसेंबर रोजी झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राज्यातील निवासी डॉक्टर गुरुवारपासून संपावर गेले होते. राज्यातील सुमारे चार हजार डॉक्टर संपावर गेल्याने याचा फटका रुग्णसेवेला बसत होता.

या प्रकरणी पोलिस निरीक्षक वायकर, पोलिस उपनिरीक्षक चौगुले आणि पोलिस नाईक सुरवासे यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सदरबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिली. मात्र त्या मारहाण करणा-या पोलिसांवर डॉक्टर संरक्षण कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी मार्ड संघटनेने केली होती. मार्डच्या संपाची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा यांनी स्युमोटो याचिका दाखल करून घेतली. तसेच राज्य सरकार आणि मार्ड संघटनेला नोटीस बजावण्यात आली.

शुक्रवारी यावर सुनावणी झाली असता राज्य सरकारच्या वतीने प्राजक्ता शिंदे यांनी मारहाण करणा-या पोलिस निरीक्षक आणि दोन हवालदार अशा तिन्ही पोलिसांनी समर्पण केल्याचे सांगितले. मात्र यावर आक्षेप घेत संबंधित पोलिसांवर तातडीने कारवाई का केली नाही, याचा जाब न्यायालयाने विचारला. यावर संबंधित प्रकरण सीआयडीकडे सोपवण्यात येईल असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले. मात्र दोषी पोलिसांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तसेच मार्डच्या डॉक्टरांनाही त्वरीत संप मागे घेण्याचे आदेश दिले. यानंतर मार्डचे अध्यक्ष डॉ. संतोष वाघचोरे यांनी सायंकाळी तातडीने बैठक घेऊन संप मागे घेणार असल्याचे आश्वासन न्यायालयात दिले. रात्री आठ वाजता सर्व डॉक्टर कामावर रुजू होतील, असे ते म्हणाले.

Leave a Comment