डॉक्टरांची संवेदनशीलता आणि हक्क

कोणत्याही सरकारी दवाखान्यात निवासी डॉक्टर हा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. कारण शासकीय रुग्णालयात नेहमीच अडचणीत सापडलेले आणि अपघातातले रुग्ण येत असतात. तिथे अशा रुग्णांची ताबडतोब दखल घेतली जावी अशी रुग्णांची अपेक्षा असते पण त्यासाठी डॉक्टरांच्या मनात संवेदनशीलता आणि रुग्णांविषयी आस्था असली पाहिजे. पण ती दिसली नाही की, लोक चिडतात. सोलापुरात असाच प्रकार घडला आणि एका डॉक्टराने बाळंतपणासाठी आलेल्या महिलेबाबत पुरेशी संवेदनशीलता दाखवली नाही असा लोकांचा समज झाला. ते चिडले आणि गोंधळ घालायला लागले. त्याच वेळी तिथे पोलीस आले होते. त्यांनी या घटनेत हस्तक्षेप केला आणि त्या डॉक्टरला त्यांनी मारहाण केली. या घटनेचे चित्रण तिथल्या सीसीटीव्ही मध्ये झाले आणि काही तासांतच राज्यभरातल्या निवासी डॉक्टरांपर्यंत पोचले. त्यांच्या मार्ड या संघटनेने ताबडतोब संप पुकारला. मार्ड ही निवासी डॉक्टरांची संघटना आहे पण ती इतक्यांदा संपावर जाते की, लोकांना ही नेहमीच संपावर जाणारी संघटना आहे की काय असे वाटायला लागले आहे. त्यांचा संप सुरू झाला आणि राज्यभरातल्या गरीब रुग्णांचे हाल व्हायला लागले. शेवटी सरकारने एका बाजूला डॉक्टरला मारहाण करणार्‍या पोलिसांना निलंबित केले आणि दुसर्‍या बाजूला संपाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली.

न्यायालयाने हा संप बेकायदा ठरवला आणि डॉक्टरांनी ताबडतोब कामावर रुजू व्हावे असा आदेश दिला. या प्रकाराने आता सारे वातावरण शांत झाले आहे. आता या प्रकाराची चौकशी होणार आहे. राज्यभरातले डॉक्टर्स निवासी डॉक्टरांना संरक्षण मिळावे अशी सातत्याने मागणी करत आहेत. तसा कायदासुध्दा आहे पण निवासी डॉक्टर आणि रुग्ण यांचे संबंध काही सुधरायला तयार नाहीत. त्यामुळे डॉक्टरांना होणार्‍या मारहाणीचे प्रकार अजून सुरूच आहेत. सोलापुरात घडलेल्या घटनांवर नजर टाकल्यास आपल्या असे लक्षात येईल की, महापालिका आणि राज्य शासन या दोन्ही पातळ्यांवर गरिबांसाठीच्या वैद्यकीय सेवेचा पूर्ण बोजवारा उडालेला आहे. एक महिला प्रसूतीसाठी महापालिकेच्या दवाखान्यात गेली होती पण तिथे तिच्यावर उपचार करायला डॉक्टर नव्हती. सारे काही पारिचारिकेने केले आणि फोनवरून डॉक्टरकडून सूचना घेऊन आपल्याला जमेल ते उपचार करून या महिलेला नागरी रुग्णालयात नेले पाहिजे असे सांंगितले. तिथे ही वेदनांनी विव्हळणारी महिला दाखल झाली अपण तिची तिथल्या डॉक्टरांनी ज्या संवेदनशीलतेने दखल घ्यायला पाहिजे त्या संवेदनशीलतेने घेतली नाही.

डॉक्टर मंडळी संवेदना गमावून बसत आहेत ही गोष्ट खरोखरच आपल्या माणुसकीविहीन वर्तनाचे द्योतक आहे. यातील संवेदनशीलतेचा मुद्दा थोडासा बाजूला ठेवू कारण दुसरे त्यापेक्षाही गंभीर मुद्दे या प्रकरणात पुढे आलेले आहेत. संबंधित पोलीस निरीक्षकाने डॉक्टरला मारहाण केली. खरे म्हणजे डॉक्टरला मारहाण करून काही फायदा नाही. तो तर अव्यवस्थेमध्ये कसेबसे काम करणारा घटक आहे. खरी चूक तर शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची आणि महाराष्ट्र शासनाच्या गलथान वैद्यकीय विभागाची आहे. या प्रकरणातील महिलेला प्रसूतीच्या शेवटच्या क्षणी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. तिथे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर हजर नव्हती. परंतु पोलीस निरीक्षकाने डॉक्टरला त्या महिलेला मदत करण्याचा आदेश सोडला. ते डॉक्टर रेडियॉलॉजिस्ट होते व ते आपण बाळंतपणाशी संबंधित नाहीत असे त्या पोलिसाला समजावून सांगत होते. अशा परिस्थितीत पोलिसांनी अधिष्ठात्यांंशी संपर्क साधून तिथे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरांना पाठविण्याची विनंती करायला हवी होती. पण त्याऐवजी त्यांनी डॉक्टरलाच मारहाण केली. सामान्य माणसाच्या मनात संवेदनहीन डॉक्टरांच्याविषयी राग असतोच. त्यामुळे लोकांनाही डॉक्टरला मारले याचा आनंद वाटत आहे. पण कोणीच तपशीलात विचार करायला तयार नाही.

ही महिला अवघडलेल्या अवस्थेत तिथे आली तेव्हा तिथे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर हजर नव्हती हा कांही त्या डॉक्टराचा. गुन्हा नाही. त्यांना मारहाण करण्यात काही फायदा नाही. हे त्या महिलेच्या नातेवाइकांना कळत नव्हते पण पोलीस निरीक्षकालाही ते समजत नसेल तर या पोलीस अधिकार्‍याला सेवेतून निलंबितच केले पाहिजे. आता काही संघटना त्या पोलीस अधिकार्‍याच्या बाजूने आणि डॉक्टराच्या विरोधात मोर्चे काढत आहेत आणि अधिष्ठत्यांना निवेदने देत आहेत. पण त्यांनी अधिष्ठात्यांच्या विरोधात मोर्चे काढायला पाहिजेत. या प्रकरणात महापालिकेच्या दवाखान्यातील अव्यवस्था सुद्धा दिसून आली आहे. डॉक्टरांच्या जागा मोकळ्या, रुग्णवाहिका नाही, तज्ज्ञ परिचारिका नाही, सार्‍या जागा महिनोन्महिने मोकळ्या आहेत. ही अवस्था मनपाच्या दिरंगाईच्या प्रशासनामुळे निर्माण झालेली आहे. शासकीय रुग्णालयांमध्येसुध्दा अशीच अवस्था असते. केवळ वैद्यकीय सेवेतच नाहीतर शासनाच्या अनेक खात्यांमध्ये प्रदीर्घकाळ खूप जागा रिकाम्या पडलेल्या आहेत. रुग्णसेवेच्या बाबतीत या रिकाम्या जागांचा ङ्गटका बसतो. तेव्हा जनता चिडते परंतु सरकारला त्याची लाज वाटत नाही. हे तर आपले खरे दुर्दैव आहे.

Leave a Comment