‘आदर्श’ घोटाळ्याचा ठपका कॉंग्रेसला भोवणार

मुंबई- ‘आदर्श’ घोटाळ्यामुळे कॉग्रेसची प्रतिमा मलीन झाली असतानाच पुन्हाद एकदा माजी मुख्यदमंत्री अशोक चव्हा ण यांना क्लीमनचिट देवून नवा वाद ओढवला आहे. आगामी काळात दोन माजी मुख्यमंत्री तसेच दोन मंत्र्यांना अभय देण्याचा निर्णय आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चांगलाच महागात पडू शकतो.

आपल्यावरील टांगती तलवार कायम राहिल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भलतेच अस्वस्थ असून, त्यांची नाराजी दूर करण्याकरिता प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा शुक्रवारी प्रयत्न केला. भ्रष्टाचाराच्या विरोधात जनमत तापले आहे. अलीकडेच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर आम आदमी पार्टीला चांगले यश मिळाले.
‘आदर्श’चा मुद्दा आगामी लोकसभा निवडणुकीत गाजण्याची चिन्हे असून विरोधकांना काँग्रेसवर टीका करण्यासाठी आयतेच कोलीत मिळाले आहे.

घोटाळे करणाऱ्या नेतेमंडळींना वेगळा न्याय लावला जात असल्याबद्दल सर्वसामान्यांमध्ये साहजिकच प्रतिक्रिया उमटते. राहुल गांधी यांनी ‘आदर्श’ अहवालाचा फेरविचार करण्याचा आदेश देऊन स्वत:ची प्रतिमा उंचाविण्याचा प्रयत्न केला, पण अहवालात ठपका ठेवलेल्या नेत्यांवर काहीच कारवाई होणार नसल्याने काँग्रेसचीच पंचाईत होणार आहे. राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांना पाठीशी घालण्यात आले असले तरी अहवालावर फेरविचार राहुल गांधी यांच्यामुळे झाला. परिणामी कारवाई न करण्याचे सारे खापर हे काँग्रेसवर फुटणार आहे.