संत सोपानदेव साहित्य नगरी, सासवड – साहित्य संमेलन एक सामाजिक गरज आहे. पूर्वी चावडी असायची, भजनाचे, कुस्त्यांचे अगदी राजकारणाचेही फड असायचे. कालांतराने त्यांची जागा सभांनी घेतली, व्यासपीठांनी घेतली. अशांपैकी महत्त्वाचे व्यासपीठ म्हणजे हे अ. भा. मराठी साहित्य संमेलन, असे गौरवोद्गार काढत संमेलनाचे उद्घाटक केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. अशी संमेलने म्हणजे एक उत्सव, सण असतो. आपण सण साजरे करतो पण दिवाळीतील भेटीगाठी आपल्याला आगळावेगळा आनंद देतात. तोच आगळावेगळा अनुभव, अनुभूती साहित्याच्या अशा उत्सवातून मिळते. ज्याचे साहित्य वाचतो तो कवी-कथाकार प्रत्यक्ष भेटतो. त्यापेक्षाही जे अभिसरण समाजात, साहित्यात घडत असते ते या माध्यमातून समोर येते. हे संमेलनही वाचकांची ही अपेक्षा पूर्ण करील, असे ते म्हणाले.
संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांची कारकीर्द त्यांच्या आई कवितेपेक्षाही अधिक आहे. पण कर्तृत्ववान माणसांच्या कर्तृत्वाची नोंद न घेण्याची उच्चभ्रू संस्कृती संपुष्टात आली आहे असे वाटत नाही, असे पवार यांनी संमेलनाला येताना विमानात एका उच्चपदस्थ मराठी व्यक्तीशी झालेल्या संवादाचे उदाहरण देत सांगितले. पुस्तके, प्रकाशन व्यवसाय यांच्यापुढील आव्हानांचा उल्लेख करत, जे चांगले आहे ते टिकणारच अशी माझी खात्री आहे. या दृष्टीनेच जुने टिकले ते का टिकले याचाही विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले. सध्याची दुनिया व्हर्च्युअल होत असली, इ-बुक्सचा जमाना वाढला तरी कागदाचा गंध, मुद्रणातले निरनिराळे प्रयोग, प्रकार, पुस्तकाचे सौंदर्य जोपर्यंत डोळ्यांना आनंद देत राहिल तोपर्यंत पुस्तक आणि साहित्यिकांचे स्थान कायम राहिल, असेही पवार यांनी सांगितले.
काळाच्या ओघात चावडी, फड, सभा असा बदल होत गेला. सभांची जागा व्यासपीठांनी घेतली. अशांपैकी महत्त्वाचे व्यासपीठ म्हणजे संमेलन. अशी संमेलने आजही फार महत्त्वाची भूमिका बजावतात. अशी उत्सवी संमेलने आगळावेगळा अनुभव, अनुभुती देतात, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी उद्घाटक म्हणून संमेलनाला शुभेच्छा देताना केले. ही संमेलने समाजाची गरज आहेत. जे समाजात, साहित्यात घडत असते ते येथील मंथनातून समोर येते. लेखकांनी, कवींनी सडेतोडपणे बोलावे अशी वाचकांची आणि नागरिकांची अपेक्षा असते, ती या संमेलनांमुळे पूर्ण होते, असे सांगतानाच, पवार यांनी साहित्यिकांनी आव्हाने पेलायला हवीत, समांतर सेन्सॉरशिपला धाडसानं सामोरे जायला हवे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
संमेलनाध्यक्ष फ. मुं. शिंदे यांच्या वाटचालीची, जडणघडणीची माहिती देताना पवार यांनी फ. मुं. कवी तर आहेतच पण त्यांना गणितातही रस आहे, असा उल्लेख केला. मला गणित कधीच जमले नाही, म्हणजे राजकारणातले जमते पण शाळा-कॉलेजमध्ये असताना गणित जमायचे नाही, अशी पुस्ती त्यांनी या वेळी जोडल्यावर उपस्थितांमध्ये हास्याचा स्फोट झाला. व्यासपीठावर रामदास आठवले हेही उपस्थित होते. रामदास म्हणजे आमच्यातील शीघ्रकवी आहेत, अशी कोपरखळीही मूडमध्ये असलेल्या पवारांनी मारली.