पुतळा उभारणीसाठी अण्णांचे राजनाथसिंहाना साकडे

गुरगांव -गुरगांव येथील सेक्टर ४-७ मधील चौकात अण्णा हजारे यांचा पुतळा बसविण्यात भाजपचा माजी नेता आणत असलेल्या अडचणीत लक्ष घालून पुतळा उभारणीसाठी मदत करावी असे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांना लिहिले असल्याचे समजते.

या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार वरील चौकात अण्णांचे दीर्घकाळचे सहकारी पी.एल. कटरिया यांनी अण्णांचा सहा फुटी पुतळा उभारण्याचा प्रयत्न केला तेव्हा हरयाणातील भाजपचे प्रवक्ते उमेश आगरवाल यांनी त्याला आक्षेप घेऊन कटारियांसह अन्य चार जणांविरोधात पोलिसांत खोटी तक्रार दाखल केली त्यावरून पोलिसांनी अण्णांच्या चार कार्यकर्त्यांना अटकही केली होती. आगरवाल यांना भाजपने २०१० साली १ वर्षासाठी पक्षातून निलंबित केले होते. त्या संदर्भात अण्णांनी राजनाथसिह यांना पत्र लिहिले आहे. त्यात अण्णा म्हणतात, मला स्वतःला पुतळा उभारण्यात कांहीही रस नाही मात्र कार्यकर्ते पुतळा उभारणीबाबत आग्रही आहेत. त्यांना तुमच्याच पक्षाच्या नेत्याकडून अडथळे आणले जात आहेत तेव्हा आपण त्यांना या प्रकरणात मदत करावी.

अण्णांच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दिल्लीत राजनाथसिह यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन हे पत्र दिले असल्याचे समजते. अण्णांनी हे पत्र २९ डिसेंबरलाच लिहिले आहे.  अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या चौकात अण्णांचा पुतळा उभारला जात आहे त्याला स्वातंत्र्यवीर लाला लजपतराय यांचे नांव असल्याने तेथे आता अण्णांचे नांव येऊ शकत नाही असे आगरवाल यांचे म्हणणे आहे. मात्र माहिती अधिकारातून मिळविलेल्या माहितीनुसार या चौकाला नावच नसल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment