प्रदूषण मृत्यूचे मोठे कारण

भारताने मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारून औद्योगिक प्रगतीकडे वाटचाल सुरू केलेली आहे. परंतु त्याचे दुष्परिणामही भोगावे लागत आहेत. औद्योगीकरणामुळे लोकांचे राहणीमान वाढले, वाहनांची संख्या वाढली आणि हवेतील प्रदूषण वाढले. या प्रदुषणामुळे श्‍वासाचे अनेक रोग होत आहेत आणि अनेक लोक अकाली मरत आहेत. बंगळूर शहरामध्ये २००१ साली करण्यात आलेल्या पाहणीमध्ये असे आढळले होते की, या शहरातल्या २५ टक्के बालकांना श्‍वसनाचा कसला ना कसला विकार जडलेला आहेच. जर लहान मुले एवढी बाधित होत असतील तर वृद्धांची काय अवस्था असेल. केवळ बंगळूरच नव्हे तर भारताच्या विविध शहरांमध्ये करण्यात आलेल्या पाहणीत असे दिसून आले आहे की, हवेच्या प्रदुषणातून होणार्‍या रोगांमुळे मरणार्‍यांची संख्या दरवर्षी १ कोटी ८० लाख एवढी झालेली आहे.

भारतीयांच्या मृत्यूचे सगळ्यात मोठे कारण कोणते, याचा शोध घेण्यात आलेला आहे. भारतामध्ये उच्च रक्तदाबाने मरणार्‍यांची संख्या सर्वात जास्त आहे. घरातल्या अस्वच्छतेमुळे होणारे प्रदूषण, तंबाखू खाणे किंवा धूम्रपान, त्याचबरोबर कुपोषण ही मृत्यूची मुख्य कारणे आहेत. या कारणांच्या पाठोपाठ आता हवेचे प्रदूषण हेही एक कारण दिसून आले आहे. या प्रकारच्या प्रदूषणाशी संबंधित रोगांमुळे मरणार्‍यांच्या संख्या एक कोटी ८० लाख असली तरी त्यातले सहा लाख २० हजार लोक अवेळी म्हणजे अगदी अल्प वयात मरण पावतात. हवेतल्या प्रदूषणाने भारताच्या आरोग्याला मोठे आव्हान उभे केलेले आहे. कारण अशा प्रकारे अवेळी मरणार्‍यांची संख्या गेल्या दहा वर्षात सहापटीने वाढलेली आहे.

दिल्लीतील सेंटर ङ्गॉर सायन्स ऍन्ड एन्व्हायरनमेंट या संस्थेने ग्लोबल बर्डन ऑङ्ग डिसीज या अहवालाच्या आधारे मृत्यूच्या या प्रमाणाचे गणित मांडले आहे. या प्रदूषणामध्ये कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण आणि वाहनांमुळे होणारे प्रदूषण यांचा मोठा वाटा आहे. भारतातल्या निम्म्या शहरांमध्ये हवेत सापडणार्‍या प्रदूषकांमध्ये नवनवीन वायू आढळले आहेत. पूर्वी हवेमध्ये नायट्रोजन ऑक्साईड, ओझोन असे वायू नव्हते. परंतु ते आता हवेत आढळत आहेत. देशातली ३० टक्के जनता शहरात राहते आणि त्यातल्या ५० टक्के जनतेला प्रदूषित हवेत श्‍वास घ्यावा लागतो. ती हवा किती प्रदूषित असल्यास चालते याचे काही माप ठरलेले आहे. परंतु या शहरातली हवा त्या मापाच्या दुप्पट दूषित झाली आहे. म्हणजे धोक्याच्या पातळीच्या वर गेलेली आहे. या शहरातली एक तृतीयांश लोकसंख्या साधारण सहन होईल एवढ्या प्रदूषित हवेत राहते.

गमतीचा भाग असा की, देशातली लहान शहरे अधिक प्रदूषित झालेली आहेत. मुंबईत इंडस्ट्रीअल झोन आणि रेसिडेन्शीयल झोन असा वस्त्यांच्या काही ङ्गरकच राहिलेला नाही. कारण मुंबईत जागा महाग झालेली आहे. तीच अवस्था कोलकत्ता, दिल्ली आणि चेन्नईची झालेली आहे. लोकांच्या वस्त्यांमध्ये कारखाने आहेत आणि कारखान्यांच्या परिसरात लोकांनी सरसकट घरे बांधलेली आहेत. दिल्लीमध्ये रहिवासी भागात कारखाना काढू नये, असा नियम असताना सुद्धा अशा वस्त्यांत १९ हजार कारखाने असल्याचे आढळले होते. तिथल्या महानगरपालिकेने हे कारखाने हटविण्याची मोहीम सुरू केली, परंतु ती व्यवहारत: चुकीची आणि अमलात आणण्यास अवघड असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तो नाद सोडून देण्यात आला.

मुंबईच्या चेंबूर भागात तर एवढे प्रदूषण आहे की, त्याला चेंबूर न म्हणता गॅस चेंबर म्हटले जाते. या संस्थेने भारतातल्या १८० शहरांची या दृष्टीने पाहणी केली तेव्हा १४१ शहरांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याचे आढळले. ग्वाल्हेर, पश्‍चिम सिंगभूम, गाझियाबाद, रायपूर आणि दिल्ली ही पाच शहरे कमालीची प्रदूषित असल्याचे दिसून आले. केरळमधील मल्लपूरम् आणि पट्टनमथिटा ही दोन शहरे केवळ कमी प्रदूषित असल्याचे दिसले. बाकी सर्व शहरांमध्ये हवा राहण्यास योग्य नसल्याचे दिसून आले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment