जे ‘आप’ला जमलं ते महाराष्ट्राला का जमत नाही- आर.आर.पाटील

मुंबई – आम आदमी पक्षानं दिल्लीत वीज दरात कपात करण्याची घोषणा केल्यानंतर याचा परिणाम महाराष्ट्रातही होऊ लागला आहे. विरोधक तर नाही, पण सत्ताधाऱ्यांमध्ये वीज दर कपातीवरुन खडके उडू लागले आहेत. काल काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी वीज कपातीची मागणी करुन मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर दिल्यानंतर आज कॅबिनेट बैठकीत ग़हमंत्री आर. आर.पाटील यांना मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार केला.

“दिल्लीत आम आदमी पक्षाला जमलं ते महाराष्ट्राला का जमत नाही” असा सवाल करत आर.आर.पाटलांनी मुख्यमंत्र्यांना खडसावलं.” ‘आप’नं जे दोन दिवसात करुन दाखवलं ते आपल्याला दोन महिन्यात सुध्दा जमलं नाही. महाराष्ट्राला सरकारनं आम आदमी पार्टीचा थोडा तरी आदर्श घ्यावा” अशा शब्दात आर.आर.पाटील यांनी आपल्याच सरकारवर ताशेरे ओढले. “वीज दरांबाबतचा नारायण राणे समितीचा अहवाल मंत्रिमंडळासमोर कधी येणार” असा प्रश्न आर.आर.यांनी उपस्थित केला. त्यामुळं आजच्या कॅबिनेट बैठकीत वीज दर कपात करण्यावरुन चांगलीच खडाजंगी उडाल्याचं चित्र आहे.

आम आदमी सरकारच्या केवळ दोनच दिवसांच्या कार्यकाळानं महाराष्ट्राच्या सत्ताधाऱ्यांमध्ये अशी उद्विग्नता निर्माण झाली आहे. त्यामुळं सरकारनं वेळीच उपाययोजना सुरू केल्या नाही तर येत्या काही दिवसात सत्ताधाऱ्यांमधुनच एकमेकांवर निष्क्रियतेचा आरोप-प्रत्यारोप सुरू होण्याची शक्यता आहेत. त्यामुळं केवळ एकमेकांना प्रश्न विचारण्यापेक्षा राज्यकर्त्यांनी जनसामान्यांच्या हिताच्या निर्णयांबाबत कृती केली, तर अधिक चांगलं होईल.