अधिकाऱ्यांवर फुटले आदर्शचे खापर; नेते सहीसलाम

मुंबई – राज्यात राजकीय भूकंप घडविणाऱ्या आदर्श सोसायटी घोटाळ्याबाबतचा चौकशी अहवाल अखेर आज सरकारने अंशतः स्वीकारला. आदर्श सोसायटीला नियमबाह्य पद्धतीने परवानग्या देणाऱ्या बड्या राजकीय असामींना अभय देत सरकारी अधिकाऱ्यांवर आदर्श घोटाळ्याचे खापर फोडण्यात आले आहे.

दरम्यान, आदर्श चौकशी अहवालावरील सरकारची कारवाई म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आदर्श सोसायटीबाबतचा चौकशी अहवाल नुकत्याच संपलेल्या नागपूर अधिवेशनात पटलावर ठेवण्यात आला होता. परंतु राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा अहवाल फेटाळण्यात आला होता. त्यानंतर सरकारवर सगळीकडून टीकेची झोड उठली होती.

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या अहवालावर चर्चा व्हायली हवी, असे मत व्यक्त केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत पुन्हा सादर केले होते.