रणजी करंडक, मुंबईचा गुजरातवर विजय

अहमदाबाद – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत आव्हान टिकवून ठेवण्यासाठी महत्वाच्या असलेल्या सामन्यात मुंबईने गुजरातचा २७ धावांनी पराभव केला. मुंबईच्या १७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा दुसरा डाव १४७ धावांवर संपुष्टात आला.

ए.आर. पटेल (६५)आणि बी.एच.मेराय (३६) वगळता गुजरातचे अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. इक्बाल अब्दुल्ला आणि विशाल दाभोळकरच्या फिरकीसमोर गुजरातच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. पहिल्या डावाप्रमाणे दुस-या डावातही इक्बाल अब्दुल्लाने गुजरातचा निम्मा संघ तंबूत पाठवला. यजमानांना घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा अजिबात उचलता आला नाही.

पहिल्या डावात सहा गडी बाद करणा-या अब्दुल्लाने दुस-या डावात पाच गडी बाद केले. विशाल दाभोळकरने चार फलंदाजांना तंबूची वाट दाखवत त्याला चांगली साथ दिली. तिस-या दिवसअखेर बुधवारी गुजरातची तीन बाद ६७ धावा अशी स्थिती होती. त्यांना चौथ्या दिवशी गुरुवारी विजयासाठी १०८ धावांची आवश्यकता होती. मात्र अब्दुल्ला आणि दाभोळकरच्या फिरकीने गुजरातचा डाव झटपट गुंडाळला. पहिल्या डावात गुजरातने मुंबईवर ९९ धावांची आघाडी घेतली होती. तरीही मुंबईच्या खेळाडूंनी निर्णायक क्षणी कामगिरी उंचावत संघाला विजय मिळवून दिला. या विजयामुळे मुंबईचे बाद फेरीतील स्थान निश्चित झाले आहे.

Leave a Comment