विविध देशात असे साजरे होते नव वर्ष

नवीन वर्षाचे स्वागत एकमेकांना शुभेच्छा देऊन, मिठाईचा आनंद घेऊन साजरे केले जाते हे खरेच. पण याशिवाय विविध देशात कांही परंपरागत रूढी पाळूनही नवीन वर्षाचे स्वागत केले जाते. घराची साफसफाई करणे ही बहुतेक देशांत पाळली जाणारी प्रथा आहे. ब्रिटनमध्ये नवीन वर्षाचे स्वागत अतिथ्यशीलतेने केले जाते. म्हणजे या दिवशी येणारा पहिला पाहुणा ऐश्वर्य आणि सौभाग्य घेऊन येईल अशी भावना असते मात्र तो पुरूष असायला हवा असाही संकेत आहे. या पाहुण्याने येताना गिफ्ट आणणे आवश्यकच तसेच त्याचे स्वागत मुख्य दारातून केले जात असले तरी बाहेर पडताना मात्र त्याला मागच्या दाराचा वापर करावा लागतो.

डेन्मार्क देशात या दिवशी आपल्या घरातील जुन्या प्लेट मित्र, नातेवाईक अथवा शेजार्‍यांच्या घरासमोर नेऊन फोडण्याची प्रथा आहे. यामुळे दोस्ती वाढते अशी भावना असते. ज्याच्या घरासमोर अधिक प्लेट फुटतील तो लोकप्रिय असेही समजले जाते. फिलिपिन्स देशात या दिवशी पोलका डॉट म्हणजे गोळ्यागोळयांचे डिझाईन असलेल्या कापडाचे कपडे वापरले जातात तसेच गोल आकाराची फळे खाल्ली जातात. हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते. चिली देशात शँपेनच्या ग्लासात सोन्याची अंगठी टाकून ते मद्द सेवन केले जाते तर प्यर्टो रिको मध्ये दरवाजा अथवा बाल्कनीतून थंड पाणी बाहेर फेकले जाते.

ऑस्ट्रेलियात या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री नागरिक शिट्ट्या, गाड्यांचे हॉर्न वाजवितात, चर्चच्या घंटाही वाजविल्या जातात. दक्षिण आफ्रिकेत चर्चच्या घंटा वाजवितात तेव्हाच नागरिक बंदूकीतून गोळ्याही उडवितात. जर्मनीत गार पाण्यात वितळलेले शिसे टाकले जाते. त्यातून जो आकार होईल त्यावरून पुढील भविष्य ठरविले जाते. म्हणजे या शिशाने हृदयाचा आकार घेतला तर लग्न होईल, गोल आकार घेतला तर भाग्य उजळेल असे. या दिवशी आदल्या रात्रीचे जेवण मुद्दाम उरविले जाते. त्यामुळे नवीन वर्षात अन्नपाणी कमी पडत नाही असाही समज आहे.

जपानमध्ये नववर्षाला ओसोगात्सु म्हटले जाते. या दिवशी सुट्टी असते पण मुख्य दरवाजात दोरी बांधून ठेवली जाते. यामुळे घरादाराचे वाईट नजरांपासून संरक्षण होते असा समज आहे. तसेच मध्यरात्री लोक जोरजोरात हसतात त्यामुळेही नवीन वर्षात येणार्याआ सर्व अडचणी दूर होतात असे मानले जाते. दक्षिण अमेरिकेत या दिवशी पिवळे कपडे खरेदी केले जातात. सोन्याचे प्रतीक म्हणून पिवळे कपडे मानले जातात. पोर्तुगाल व स्पेन देशात १२ दा्राक्षे खाण्याची प्रथा असून यामुळे वर्षाचे १२ ही महिने सुखासमाधानाचे जातात असा समज आहे.

Leave a Comment