न्यूझीलंडच्या अँडरसनने ३६ चेंडूत झळकावला वेगवान शतकाचा विश्वविक्रम

क्विंन्सटाऊन- वेस्ट इंडिजच्या दौ-यावर असलेल्या पाहुण्या न्यूझीलंडने तिस-या एकदिवसीय सामन्यात अक्षरश इंडिज गोलंदाजांची कत्तल केली. मधल्या फळीतील फलंदाज कोर्य अँडरसनने आज अवघ्या ३६ चेंडूत शतक ठोकण्याचा पराक्रम करीत पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीचा विश्वविक्रम मोडला. अंडरसनने १२ षटकार आणि ४ चौकारासह विश्वविक्रमी शतकाला गवसणी घातली. याचबरोबर त्याचा सहकारी जेसी रायडरनेही १२ चौकार आणि ५ षटकारासह फक्त ४६ चेंडूत शतक ठोकले.

न्यूझीलंड सध्या वेस्ट इंडिज दौ-यावर आहे. आज तिसरा एकदिवसीय सामना होत आहे. क्विनलँड येथे होत असलेल्या सामन्यावर पावसाने मेहरबानी केली. त्यामुळे निम्म्या दिवसाचा वेळ वाया गेला. त्यानंतर सुरु झालेला सामना प्रत्येकी २१ षटकांचा पंचानी ठरविला. त्यानुसार इंडिजने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला फलंदाजीला आमंत्रित केले. न्यूझीलंडचा सुरुवात खराब झाली. दुस-या षटकात सलामीवीर मार्टिन गुप्टिल १ धावेवर बाद झाला. त्यानंतर कर्णधार ब्रेंडन मॅकल्लम ११ चेंडूत ३३ धावा काढून बाद झाला. रॉस टेलरही हाणामारी करण्याच्या नादात केवळ ९ धावांवर बाद झाला. त्यानंतर मैदानात आलेल्या अँडरसनने रायडरच्या साथीने इंडिज गोलंदाजांवर हल्ला चढविला.

अँडरसनने सुरुवातीला आक्रमक सुरू केले. त्यानंतर रायडरही जोषात खेळू लागला. या दोघांनी बघता बघता केवळ ५८ चेंडूत १५० धावांची भागीदारी रचली. त्यात १०७ धावांचा वाटा अंडरसनचा होता. त्याने रॉमपॉलवर हल्ला चढविला. त्याच्या तीन षटकात अँडरसन-रायडर जोडीने तब्बल ६४ धावा कुटल्या. रायडर ५१ चेंडूत १२ चौकार व ५ षटकारांसह १०४ धावांवर शेवटच्या षटकात होल्डरच्या गोलंदाजीवर बाद झाला. अँडरसन मात्र ४७ चेंडूत १४ षटकार आणि ६ चौकारासह १३१ धावांवर नाबाद राहिला. या दोघांच्या जबरदस्त प्रहारामुळे न्यूझीलंडला २१ षटकात ४ बाद २८३ धावांची मजल मारता आली.

Leave a Comment