सॅमसंगने सादर केला ११० इंची टिव्ही – किंमत १ कोटी रूपये

सॅमसंग या दक्षिण कोरियन इलेक्ट्रोनिक कंपनीने ११० इंची अल्ट्राएचडी टिव्ही सादर केला असून त्याची किंमत दक्षिण कोरियात दीड लाख डॉलर्स म्हणजे भारतीय चलनात १ कोटी रूपये इतकी आहे. हा टिव्ही चीनसह मध्यपूर्व देशात आणि युरोपातही लवकरच उपलब्ध करून दिला जाणार आहे. वेगवेगळ्या देशांसाठी या टिव्हीची किंमत वेगवेगळी असेल असे कंपनीने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे कंपनीला पश्चिम आशियाई देशांतून आत्तापर्यंत १० ऑडर्स मिळाल्या आहेत.

गतवर्षी सॅमसंग आणि एलजी या दोन बड्या टिव्ही उत्पादक कंपन्यांनी ओएलइडी हेच टिव्ही क्षेत्राचे भविष्य असल्याचे जाहीर केले होते. हे स्क्रीन अतिशय पातळ असतात आणि त्यावरचे चित्र अधिक स्पष्ट आणि आकर्षक दिसते. मात्र हे स्क्रीन बनविणे महागडे काम आहे. त्याऐवजी अल्ट्राएचडी टिव्ही तुलनेने कमी किंमतीत बनतात आणि गुणवत्तेच्या दृष्टीनेही उत्तम आहे हे लक्षात आल्यानंतर या दोन्ही कंपन्यांनी त्यावरच अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.

या टिव्हींची मागणी वाढेल असे संकेत आत्तापासूनच मिळत आहेत. त्यामुळे भविष्यात त्यांच्या किमतीही उतरतील असे सांगितले जात आहे. सध्या या टिव्हींना चीनमधून मोठी मागणी असून या वर्षी किमान १३ लाख टिव्ही विकले जातील तर हेच प्रमाण २०१७ सालापर्यंत २ कोटी ३० लाखांवर जाईल असा विश्वास कंपनीच्या प्रमुखानी व्यक्त केला आहे.

Leave a Comment