महाराष्ट्रात बसपा स्वबळावर लढणार

मुंबई – महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा तसेच विधानसभेच्या २८८ जागा बहुजन समाजवादी पार्टी स्वबळावर लढणार असून कोणाशीही युती करणार नाही असे बसपाचे प्रदेशध्यक्ष विलास गरूड यांनी सांगितले. ते म्हणाले की लखनौत होत असलेल्या मायावती यांच्या रॅलीत या संदर्भातली घोषणा अपेक्षित आहे. या रॅलीसाठी महाराष्ट्रातून ५० हजार कार्यकर्ते लखनौला जाणार आहेत.

गरूड म्हणाले की काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना त्यांच्या व्यक्तीगत स्वार्थासाठी दलितांना जवळ करतात आणि राज्यातील दलित नेतेही त्यांच्या इशार्‍यावर चालतात. रामदास आठवले यांना जनाधार नाही. यामुळे आम्ही सर्व दलितांना संघटीत व्हा अशी विनंती केली आहे. विधानसभेसाठी कांही जागांवर उमेदवार निश्चितही केले आहेत. त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले गेले आहेत. तिकीट वाटपात आम्ही दलित, मुस्लीम आणि उत्तर भारतीयांना जादा प्राधान्य देणार आहोत असेही त्यांनी सांगितले.