नवी दिल्ली – अमेरिकेत वादग्रस्त ठरलेल्या भारतीय राजदूत देवयानी खोब्रागडे यांच्यावरच्या कारवाईची भारत सरकारने कितीही गंभीर दखल घेतली असली तरी अमेरिकेच्या सरकारने त्यांना माङ्गी देण्यात येणार नाही असे स्पष्ट केले आहे. उलट त्यांच्यावरची कारवाई शिक्षेपर्यंत नेता यावी यासाठी सरकारने अधिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे, असे अमेरिकेच्या सरकारने म्हटले आहे.
देवयानी खोब्रागडे यांच्यावर कारवाई करण्यात तसेच त्यांना अटक करण्यात अमेरिकेच्या सरकारचा कसलाही दूषित हेतू नाही, त्यामुळे कारवाई मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही असे त्या सरकारचे म्हणणे आहे. असे असले तरी भारत सरकारने देवयानी खोब्रागडे यांना संयुक्त राष्ट्रांत पाठवून कारवाईपासून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर आपल्या कारवाईची दिशा काय असावी यावर अमेरिका विचार करीत आहे.
संयुक्त राष्ट्रात नेमलेल्या कोणत्याही देशाच्या प्रतिनिधीवर अमेरिकेत तिथल्या कायद्यानुसार कारवाई करता येत नाही. मात्र देवयानी खोब्रागडे या पदावर असेपर्यंतच कायद्यापासून सुटका करून घेऊ शकतील. या पदावर असेपर्यंत त्यांना सूट मिळाली असली तरी ती तात्पुरती आहे. त्यांना या पदावरून कधी ना कधी जावेच लागणार आहे आणि निवृत्तीनंतर तरी कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. म्हणजे देवयानी खोब्रागडे यांच्यावरची कारवाई केवळ लांबणीवर पडणार आहे.