दक्षिण आफ्रिकेने मालिका १-० अशी जिंकली

डर्बन- दुस-या आणि अंतिम कसोटीत सोमवारी भारताला १० विकेटनी हरवत दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली. अजिंक्य रहाणेच्या (९६ धावा) एकाकी लढतीनंतरही भारताचा दुसरा डाव २२३ धावांत संपला. त्यानंतर विजयासाठीचे ५८ धावांचे आव्हान माफक आव्हान यजमानांनी ११.४ षटकांत एकही विकेट न गमावता पार केले. ढोणी आणि सहका-यांचा या वर्षातील हा पहिलाच पराभव आहे. पाचव्या आणि अंतिम दिवशी कसोटीसह मालिका पराभव टाळण्याचे मोठे आव्हान पाहुण्यांसमोर होते. मात्र दोन बाद ६८ वरून भारताचा दुसरा डाव २२३ धावांवर चहापानापूर्वी आटोपला.

ढोणी आणि सहका-यांवर पराभवाची टांगती तलवार होती. मात्र पहिल्या कसोटीप्रमाणे ते यजमानांना झुंजवतील, असे वाटत होते. परंतु, सर्व अपेक्षा फोल ठरल्या. अजिंक्य वगळता सर्वानी निराशा केली. प्रमुख फलंदाजांसह भागीदारी रचण्यात आलेले अपयश पाहुण्यांच्या निराशाजनक पराभवाचे प्रमुख कारण ठरले. भारताला एकही अर्धशतकी भागीदारी साकारता आली नाही. धवन आणि पुजाराची दुस-या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी सर्वाधिक ठरली तरी अजिंक्यने रोहित शर्मासह पाचव्या विकेटसाठी ३३, कर्णधार महेंद्रसिंग ढोणीसह सहाव्या विकेटसाठी ४२ आणि तळातील झहीर खानसह आठव्या विकेटसाठी ३५ धावा जोडल्यामुळे भारताला सव्वा दोनशेच्या घरात पोहोचता आले.

सलग दुस-या डावात अर्धशतकी मजल मारणा-या अजिंक्यने सर्वाची मने जिंकली. मात्र शतक हुकल्याची चुटपूट लागली. अजिंक्यने जवळपास चार तास खेळपट्टीवर उभे राहताना १५७ चेंडूंत ११ चौकार आणि दोन उत्तुंग षटकारासह ९६ धावांची चमकदार खेळी केली. त्याचे कारकीर्दीतील हे दुसरे अर्धशतक आहे. वास्तविक पाहता पाचव्या दिवशी पहिल्याच तासात झटपट विकेट पडल्यानंतर भारताचा पराभव नक्की झाला. डावखुरा फिरकीपटू रॉबिन पीटरसनसह (चार विकेट) वेगवान गोलंदाज डेल स्टेन आणि व्हर्नन फिलँडरच्या (प्रत्येकी तीन विकेट) प्रभावी मा-यासमोर पाहुण्यांचा डाव पत्त्याप्रमाणे कोसळला.

दिवसातील पहिल्याच चेंडूवर स्टेनने विराट कोहलीला (११) यष्टिरक्षक एबी डेविलियर्सकडे झेल देण्यास भाग पाडले. ऑफस्टंपबाहेरील चेंडू खेळताना बॅटची कडा लागून गेल्याचे स्टेनचे अपील अंपायर रॉड टकर यांनी उचलून धरले तरी चेंडू कोहलीच्या बॅटला नव्हे तर खांद्याला लागल्याचे ह्यरिप्लेह्णमध्ये दिसत होते. मात्र टकर यांच्या चुकीच्या निर्णयाचा कोहली बळी ठरला. पहिल्या कसोटीत टकर यांचा कॅलिसला बाद देण्याचा निर्णयही वादग्रस्त ठरला होता. कोहलीनंतर तीन धावांच्या फरकाने चेतेश्वर पुजाराही (३२) माघारी परतला. पुढच्याच षटकात स्टेनने त्यांचे स्टंप उखडले. रोहित शर्माने (२५) आश्वासक सुरुवात केली.

मध्यंतरी त्याच्यात आणि स्टेनमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली. मात्र भारताचे शतक फलकावर लागल्यानंतर फिलँडरने रोहितला पायचीत केले. अजिंक्य रहाणेने एक बाजू लावून धरली तरी दुस-या बाजूने विकेट पडत होत्या. मात्र खचून न जाता त्याने उपाहारापूर्वी अर्धशतक पूर्ण केले. उपाहारानंतर आणखी झटपट धावा करताना रहाणेने पहिल्या-वहिल्या शतकाच्या दिशेने झेप घेतली. मात्र त्याचे नशीब जोरावर नव्हते. फिलँडरला चौकार आणि षटकार ठोकत अजिंक्यने नव्वदीत प्रवेश केला. मात्र ९६ धावांवर असताना आणखी एक चौकार मारून शतक पूर्ण करण्याच्या नादात फिलँडरने त्याचा त्रिफळा उडवला.

Leave a Comment