डर्बनच्या मैदानात घुमला मराठी आवाज

डर्बन – डर्बनच्या मैदानात आज मराठी आवाज घुमला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव निश्चित आहे. मात्र पराभव टाळण्यासाठी दोन मुंबईकर आटोकाट प्रयत्न करताना दिसले. एक म्हणजे अजिंक्य रहाणे आणि दुसरा झहीर खान. इकडे गेला तर मी दोन बघू शकतो, खेळत राहा तू, जास्ती विचार करू नको असं झहीर खान, अजिंक्य रहाणेला म्हणाला. म्हणजेच जर ऑन साईडला खेळलास तर दोन धावा घेता येतील, असं झहीर म्हणाला.

तू खेळत राहा, जास्त विचार करू नको, असा दिलासा झहीरने अजिंक्य रहाणेला दिला. यावर अजिंक्य रहाणेनेही होकारार्थी मान डोलवत त्याला प्रतिसाद दिला. आफ्रिकेच्या फिलँडरची ओव्हर सुरू असतानाच, डर्बनच्या मैदानात हा मराठी आवाज घुमत होता. यावेळी भारताची अवस्था 7 बाद 182 अशी होती. भारतीय डावाची पडझड सुरू असताना मुंबईकर अजिंक्य रहाणे मात्र तळ ठोकून उभा होता. शेवटच्या विकेटपर्यंत त्याने खिंड लढवली.

मात्र आपल्या खेळीला शतकी साज चढवण्यापासून तो वंचित राहिला. रहाणे 96 धावा करून बाद झाला. एकेकाळी मुंबई आणि महाराष्ट्र= भारतीय टीम अशी स्थिती होती. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सुनिल गावसकर, रवी शास्त्री, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, अजित आगरकर अशा क्रिकेटपटूंनी भारतीय संघात दमदार कामगिरी केली. ही यादी वाढतीच राहिली. मात्र गेल्या काही काळात टीम इंडियात मुंबईकर खेळाडू दिसेनासे झाले. सचिन तेंडुलकर वगळता कोणीही सात्यत्याने भारतीय संघात स्थान टिकवू शकत नव्हता. पण आता रोहित शर्मा, झहीर खान आणि अजिंक्य रहाणे हे तिघे मुंबईकर भारतीय संघासाठी खिंड लढवत आहेत.

Leave a Comment