योगाचा श्वासावर परिणाम

योगासने आणि प्राणायाम यांचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो असे म्हटले जाते आणि आपली त्यावर श्रद्धा आहे. परंतु अमेरिकेतले लोक अशा श्रद्धेतून कोणतीही गोष्ट स्वीकारत नसतात. ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ अशा रोखठोक बाण्याने एखादी गोष्ट सिद्ध झाली तरच ती अमेरिकेत स्वीकारली जाते. अमेरिकेत लोकांनी आता योगाचा स्वीकार केला आहे. योगशास्त्र हे भारतीयांनी जगाला दिलेले आहे. परंतु भारतीयांपेक्षा अमेरिकेमध्ये योगाचा अभ्यास करणार्‍यांची संख्या जास्त आहे आणि त्यांनी हे योगशास्त्र प्रयोगाअंतीच स्वीकारलेले आहे. अमेरिकेत योगाचे क्लासेस मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. त्यामुळे योगाच्या क्लासला जाणारे लोक आणि त्या वाटेला न जाणारे लोक यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. तेव्हा नियमाने योगाच्या क्लासला जाणार्‍या साधकांना हृदयाच्या काही विकारांमध्ये दिलासा मिळत असल्याचे आढळले.

विशेषत: या लोकांच्या हृदयाच्या ठोक्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला तेव्हा योगोपचार घेणार्‍यांच्या हृदयाचे ठोके नियमितपणे आणि सामान्यपणे पडतात, असे दिसून आले. या उलट योगाच्या क्लासला न जाणार्‍या लोकांच्या हृदयाचे ठोके तुलनेने अनियमित असल्याचे आढळले. योगोपचार घेणार्‍यांच्या मनाचे स्थैर्य सुद्धा चांगले असल्याचे दिसून आले. अमेरिकेतल्या अमेरिकन हार्ट असोसिएशन या संस्थेने ही पाहणी केली. या देशामध्ये २७ लाख लोकांना ऍट्रीयल ङ्गायब्रिलेशन हा हृदयाचा विकार असल्याचे आढळले आहे.

या विकारामध्ये हृदयाचा वरच्या कप्प्याच्या हालचाली सामान्य होत नाहीत, अशा लोकांच्या हृदयाचे ठोके अनियमित असतात. अशा रुग्णांना योगोपचाराचा चांगला गुण येतो. त्यांच्या हृदयाचे ठोके मिनिटाला ६७ एवढे असतात. ते सामान्यांपेक्षा जास्त असतात. परंतु त्यांनी योगासने केली तर आसनानंतर त्यांच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला ६१ ते ६२ असे कमी झालेले आढळतात. म्हणजे त्यांच्या हृदयाची धडधड थोडी कमी झालेली असते. असाच प्रयोग शवासनाच्या बाबतीत केला असता काही गुण आल्याचे आढळले. सकाळी आणि संध्याकाळी १५ ते २० मिनिटे शवासन केल्यास दिवसभरामध्ये शर्करेचे रक्तातले प्रमाण नियंत्रित राहते, असे दिसून आले आहे.