बायो पेन – शस्त्रक्रियेसाठी ठरणार अनोखे वरदान

गंभीर दुखापती, अपघात या सारख्या घटनांत अनेक वेळा हाडे मोडणे, कातडी फाटणे, स्नायू फाटणे असे प्रकार होतात आणि त्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असते. यासाठी येणारा खर्च असा जास्त असतो तसेच या शस्त्रक्रिया करताना आणि रिकव्हरीसाठी बराच काळ ही जातो. यावर वरदान ठरू शकेल असे बायोपेन संशोधकांनी विकसित केले असून त्याच्या चाचण्या मेलबर्न येथील रूग्णालयात सुरू आहेत.

थ्रीडी प्रिंटरप्रमाणे काम करणारे पेनसारखेच दिसणार्‍या या उपकरणात स्टेम सेल आणि पेशी वाढण्यासाठी आवश्यक असलेले द्राव भरलेले असतात. रूग्णावर उपचार करताना सर्जन या उपकरणाच्या सहाय्याने दुखापत झालेल्या ठिकाणी मानवी पेशींचे थेट रेापण करू शकतात. जेथे ज्या पेशी रोपण केल्या जातात तेथे त्या विभाजन होऊन पूर्ण वाढतात. मोडलेल्या हाडांच्या फटी यामुळे जशा पूर्ववत करता येतात तसेच फाटलेले स्नायू, हाडांच्या सांध्यात असणारे कार्टिलेज, फाटलेली त्वचा पूर्ववत करता येते व त्यासाठी लागणारा वेळही अगदी कमी असतो.

उदाहरण द्यायचे तर हाड मोडलेल्या जागी हे पेनासारखे उपकरण फिरवून तेथे पेशी रोपण केल्या जातात त्यावर जेलसारख्या पदार्थांचा थर दिला जातो आणि अल्टा व्हायोलेट किरणांने सर्व फिक्स केले जाते. त्यामुळे भरलेल्या जखमांना संरक्षणही मिळते आणि आवश्यकतेनुसार नर्व्ह पेशी, स्नायू पेशी, हाडातील पेशी तयार होऊन अवयव पूर्ववत होऊ शकतो. युनिव्हर्सिटी ऑफ वालॉलंगाँग येथील शास्त्रज्ञानी हे संशोधन केले आहे.