आबुधाबीत भरलीय उंटांसाठी सौंदर्यस्पर्धा

आबुधाबी – दरवर्षाला जगभरात कुठे ना कुठे सौंदर्यस्पर्धा सुरू असतात.  मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स यासारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे थेट प्रक्षेपणही केले जात असते आणि जगभरातील विविध देशातील सौंदर्यवती आपल्या सौंदर्याची परिक्षा अशा स्पर्धातून घेत असतात. मात्र वाळवंटी देश असलेल्या आबुधाबी येथील सौंदर्यस्पर्धा आगळीवेगळीच म्हणावी लागेल.

येथील अल दाफ्र कॅमल महोत्सवासाठी जगभरातील पर्यटक येत असतात .गेली सात वर्षे सुरू असलेला हा महोत्सव यंदा २२ डिसेंबरपासून सुरू झाला आहे आणि तो दोन आठवडे चालणार आहे. या महोत्सवातही सौदर्यस्पर्धा घेतली जाते आणि येथे सौंदर्यवती म्हणून तरूणी नसतात तर ही स्पर्धा असते उंटांसाठी. वाळवंटी भागात उंट हा प्राणी अति उपयुक्त. घरोघरी गाई म्हशी असाव्यात तसे तेथे उंट पाळले जातात आणि तुमच्याकडे किती उंट आहेत यावर तुमची श्रीमंतीही ठरत असते.

येथे होणार्‍या सौंदर्यस्पर्धात हजारो उंट सामील होतात. या स्पर्धा दोन प्रकारात होतात. हलक्या रंगांच्या उंटांतून एक आणि गडद रंगांच्या उंटातून एक उंट सौंदर्यवान म्हणून निवडले जातात. त्यासाठी डोक्याचा आकार, मानेची लांबी, पाठीवरील मदारीचा आकार इतकेच नव्हे तर उंटाची वर्तणूक असे निकष लावले जातात. त्यात सर्वोतम ठरलेल्या उंटांना विजयी घोषित केले जातेच पण त्यांना २० लाख पौंडांपर्यंत किंमतही मिळते असे समजते.