हिवरेबाजारचे पोपटराव करताहेत १०० गावांचा कायापालट

हिवरेबाजार – समाजसेवक अण्णा हजारे यांनी त्यांच्या गावाचा म्हणजे राळेगण सिद्धीचा केलेला कायापालट पाहून त्यापासून प्रेरणा घेतलेले हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार १०० गावांचा कायापालट करण्याच्या कामात गुंतून गेले आहेत. अण्णांना गुरू मानणार्‍या या शिष्याने गुरूला याबाबत केव्हाच मागे टाकले आहे. या गावात शेतकरी आत्महत्येमुळे गाजलेल्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील तसेच बुलढाणा जिल्ह्यातील गावांचाही समावेश आहे.

पुणे विद्यापीठातून एम कॉम झालेले पोपटराव त्यांच्या हिवरेबाजार गावी आले तेव्हा म्हणजे १९८९ साली गावाची अवस्था गाव म्हणू नये अशी होती. दुष्काळामुळे पाणी नाही, दारूबाजांचा उच्छाद, अस्वच्छता, नावालाही नसलेली हिरवाई अशी अनेक आव्हाने त्यांच्यासमोर होती. मात्र अण्णांनी राळेगणचा केलेला कायापालट त्यांच्यासमोर होता. त्या पावलांवर पाऊल टाकून त्यांनी कामाला सुरवात केली. गावात स्वच्छता अभियान राबविले, बंधारे बांधून पाणी जिरविले, शेतीसाठीजादा पाणी घेणारी पिके घेण्यास अटकाव केला आणि पाहता पाहता गाव आदर्श बनले. हिरवाईने नटले, सुजला सुफला झाले. अर्थात गावकर्यांाशी मोकळेपणाने साधलेला संवाद, आपल्य कामात त्यांचा मिळविलेला सहभाग आणि प्रामाणिक व सचोटीने केलले प्रयत्न यामुळे हे यश मिळाले.

पोपटरावांकडे १०० गावांचा याच प्रकारे कायापालट करण्याची जबाबदारी शासनाने सोपविली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या हिवरेबाजारला ११२ विविध देशांच्या प्रतिनिधींनी भेट दिली आहे.

Leave a Comment