दिल्लीच्या नाटकातले प्यादे आणि मोहरे

दिल्लीच्या व्यासपीठावर एक मोठे नाटक चाललेले आहे. या नाटकाचा अंत काय होणार आहे हे माहीत नाही. या नाटकाचा नायक आहे राहुल गांधी. नाटकाचे एक वैशिष्ट्य असते. नाटकाचा हिरो नाटक लिहीत नसतो. नाटककार लिहितो, दिग्दर्शक दिग्दर्शित करतो आणि नेपथ्यकार जसे नेपथ्य मांडतात त्यावर हिरो दिग्दर्शकाच्या सूचनानुसार हालचाली करतो. नाटकातून हिरोची प्रतिमा चांगली दाखवायची असते. राहुल गांधींच्या सल्लागारांना त्यांची प्रतिमा अण्णा हजारेपेक्षाही उजळ करायची आहे. हा झाला नाटककाराचा हेतू परंतु नियती अशा काही घटना घडवत असते आणि आपल्या सर्वांच्या नकळत अशा काही अगम्य घडत असतात की त्या घटना सार्‍या कथानकाला वेगळीच कलाटणी देऊन जातात. दिल्लीच्या राजकीय व्यासपीठावरच्या नाटकाला कशी कशी वळणे मिळणार आहेत याचा अंदाज घेण्यात सध्या राजकीय निरीक्षक गुंतले आहेत आणि खरोखरच सर्वांच्या नकळत अगम्य घटना घडणार आहेत. तसे संकेतही मिळत आहेत. कॉंग्रेसचे काही मुख्यमंत्री आणि एवढेच नव्हे तर खुद्द पंतप्रधानसुध्दा या नाटकातल्या आपापल्या भूमिका वठवण्यास सज्ज झाले आहेत. पंतप्रधानांनी लोकप्रतिनिधींच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर त्यांना वाचविण्याची भूमिका घ्यायची आणि राहुल गांधींनी या भूमिकेला नॉनसेन्स असे म्हणून ती बदलायला लावायची. हा या नाटकाचा पहिला अंक होता. दुसरा अंक आता आदर्शवरून सुरू झाला आहे.

आदर्श प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी भ्रष्ट मुख्यमंत्र्यांना पाठिशी घालायचे आणि राहुल गांधींनी नेमका त्याच्या विरुध्द निर्णय घेऊन आपण भ्रष्टाचाराचे कर्दनकाळ आहोत अशी आपली प्रतिमा उभी करायची. आता या नंतर तिसरा अंक कोणता असणार आहे हे माहीत नाही. कदाचित तो दिल्लीत असेल. आम आदमी पार्टीचे नवे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शीला दीक्षित यांना उघडे पाडायचे आणि राहुल गांधींनी केजरीवालांची पाठ थोपटून आपणही केजरीवाल यांच्याच पंथाचे आहोत असा भास निर्माण करायचा. असे काही प्रकार झाले की राहुल गांधींची प्रतिमा उजळून निघेल आणि देशातल्या भ्रष्टाचाराचा खातमा करणारा देवदूत राहुल गांधींच्याच रूपाने जन्माला आला आहे असे वातावरण निर्माण होऊन लोकसभेच्या निवडणुकीच्या नाटकावर राहुल गांधींच्या दृष्टीने सुखांत शेवट होऊन पडदा पडणार आहे. निदान या नाटककारांची कल्पना तरी तशी आहे. ही सारी योजना सोनिया गांधी यांनासुध्दा मंजूर नाही. कारण हे नाटक नीटसे वठणार नाही असा त्यांचा अंदाज आहे. नाटककारांनी कितीही कल्पना रचल्या तरी त्या कल्पनांना आणि कथानकांना वास्तवाचा आधार असला पाहिजे.

अवास्तव आधारावर कथानके रचायला सुरूवात केली तर नाटकाचा ङ्गियास्को होतो. भ्रष्टाचार निर्मुलन हा आधार घेऊन राहुल गांधी यांच्या भोवती नाटक रचणे हे अवास्तव आहे. कारण कॉंग्रेस पक्षाचा आणि राहुल गांधी यांच्या घराण्याचा वास्तव इतिहास भ्रष्टाचाराने लडबडलेला आहे. कोणा तरी तीसमारखॉंला नाटकापुरते लढवय्याचे रूप दिले तर कधी ना कधी वास्तव उघडे पडतेच. जो पक्ष गेले काही दशके भ्रष्टाचाराशिवाय दुसरे काहीच करत नाही तो पक्ष भ्रष्टाचाराचा कर्दनकाळ म्हणून समोर यायचा प्रयत्न करत असेल त्याला किती कसरती कराव्या लागतील याचा अंदाज कॉंग्रेसच्या काही नेत्यांच्या आणि सोनिया गांधी यांच्या अनुभवी नजरेला आलेला आहे. पण मिलिंद देवरा याच्यासारख्या अल्पबुध्दीच्या नेत्याने राहुल गांधींच्या विश्‍वासू सहकार्‍यांच्या वर्तुळात शिरकत करून घेण्यासाठी राहुल गांधींना आदर्श प्रकरणात कडक भूमिका घेण्यास भाग पाडले आहे. राहुल गांधींच्याही कल्पनेची मजल ङ्गार लांब जात नाही. त्यांनीही आपली प्रतिमा सुधारण्याच्या खटपटीत आदर्शचे झेंगट आपल्या पक्षाच्या गळ्यात अडकवून टाकले आहे.

सीबीआयने आदर्श गृहनिर्माण भ्रष्टाचारामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर ङ्गौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती पण राज्यपालांनी तिला अनुमती दिली नाही. आता राहुल गांधी यांनी दिशा बदलली आहे. त्यामुळे राज्यपालांवर दबाव आणून त्यांच्याकडूशन अनुमती मिळवावी लागणार आहे. तशी ती मिळाली की अशोक चव्हाण यांच्यासह सुशीलकुमार शिंदे अणि शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर सीबीआयतर्ङ्गे पोलिसांची कारवाई सुरू होईल आणि हे सारे नेते ए. राजा आणि सुरेश कलमाडी यांच्या मांदियाळीत जाऊन बसतील. शिंदे हे सध्या गृहमंत्री आहेत. त्यांच्यावर पोलिसांची कारवाई सुरू होईल तेव्हा त्यांच्या राजीनाम्याची मागणी होईल. अशा रितीने शिंदे, निलंगेकर, शीला दीक्षित एका मागेएक राजकारणातून बाद व्हायला लागले तर ते राहुल गांधींचा हा वरवंटा मुकाट्याने सहन करतील असे काही वाटत नाही. कारण राहुल गांधींना अनेक नेत्यांना दुखवावे लागणार आहे. त्यांच्या सल्लागारांना पुढच्या या सगळ्या परिणामांची कसलीच जाणीव झालेली नाही. असे या सगळ्या उथळ व्यवहारांवरून दिसून येत आहे.

Leave a Comment