कर्नाटकात चिकमंगळूर येथे जातीय तणाव

चिकमंगळूर – कर्नाटकाच्या दक्षिण भागातील चिकमंगळूर शहरात काल जातीय तणाव निर्माण झाल्याने सर्व व्यवहार बंद पडले. दोन गटात मोठी चकमक उडण्याची शक्यता दिसल्यावरून पोलिसांनी लाठीमार केला, त्यात अनेक लोक जखमी झाले. शहरामध्ये काही विपरीत घटना घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शेजारच्या जिल्ह्यातून जादा पोलीस कुमक मागविण्यात आली आहे.

काल रविवारी सकाळी काही लोक आपल्या प्रार्थनास्थळावर प्रार्थनेसाठी गेले असता त्यांना त्यांच्या प्रार्थनास्थळाच्या दारात प्राण्याचे मांस टाकलेले दिसले. त्यामुळे ते लोक संतप्त झाले. त्यांनी या घटनेचा निषेध करीत शहरातली दुकाने बंद करण्यास सुरुवात केली. आपल्या धार्मिक भावना दुखावल्या असल्याने सारे बाजारपेठ बंद राहिली पाहिजे असा आग्रह धरला. त्यामुळे त्यांना व्यापार्‍यांनी विरोध करण्यास सुरुवात केली.

व्यापारी आणि त्यांची दुकाने बंद पाडणारे हे भाविक यांच्यात शहरातल्या दोन मोठ्या बाजारपेठांमध्ये चकमक झडण्याची शक्यता निर्माण झाली. परिणामी पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि त्यांनी जमावबंदीचे कलम १४४ पुकारले. कलमाचा आदर न राखता रस्त्यावर उतरलेल्या लोकांवर त्यांनी लाठीमार सुरू केला. त्यात अनेक लोक जखमी झाले.