उत्तम विषयाची आशयहीन मांडणी

अलीकडचा दिग्दर्शक संजय लिला भन्साळीचा ‘ब्लॅक’, अमीर खानचा ‘तारें जमींपर’ काही दिवसांपूर्वी आलेला ‘माय डियर यश’ आदी चित्रपटांमधून लहान मुलांच्या व्यंगावर भाष्य करण्यात आलेले आहे. खल्लास गर्ल इशा कोप्पीकरची मराठीमध्ये एण्ट्री असलेल्या ‘मात’मध्ये कर्णबधिरता हा विषय दिग्दर्शकाने हाताळला आहे.

समीर धर्माधिकारीने साकारलेला ‘मात’ मध्ये अजय व्यवसायाने आर्किटेक्ट आहे. रॅम्पवर कॅटवॉक करणार्‍या रिमाला पाहिल्यानंतर अजयच्या हृदयाचा ठोका चुकतो. आपल्या स्वप्नातील परी हीच असल्याची त्याला जाणीव होते. रिमा आणि अजय एकमेकांच्या प्रेमात पडतात. लग्नाच्या बेडीत अडकण्याचं स्वप्न पाहू लागतात. मनाप्रमाणे लग्नही होतं. दोघांचा संसार अगदी आनंदात चाललेला असतो. थोड्याच दिवसांत त्यांच्या घरी छोटी परी अवतरते. या लहानग्या परीचं नाव मिनी देशमुख. रिमा आणि अजयच्या जीवनात मिनीची एन्ट्री होताच दोघांच्याही आनंदाला पारावार उरत नाही. दोघेही आपापल्या परीने मिनीचं करिअर घडवण्याची स्वप्न पाहू लागतात.

मिनीने एक नामवंत आर्किटेक्ट व्हावं हे अजयचं स्वप्नं, तर मोठेपणी सुपर मॉडेल बनून जागतिक पातळीवर तिने नावलौकिक कमवावं असं रिमाला वाटत असतं. मिनीसाठी पाहिलेल्या या स्वप्नांचा चढता-उतरता आलेख वैविध्यपूर्ण घटनांच्या माध्यमातून यात रेखाटण्यात आला आहे.

मनोहर सरवणकर दिग्दर्शित ‘मात’चं कथानक तेजस्विनी दिनेश पंडीत यांच्या सेतू या कादंबरीवर आधारित असून पटकथा – संवाद संभाजी सावंत यांनी लिहिले आहेत. आपल्या मुलीत व्यंग असल्यामुळे तिच्यापासून दूर राहण्याचा वडिलांनी घेतलेला निर्णय त्यासोबतच पत्नीचे वडील हे कर्णबधिर असल्यामुळे या व्यंगाला असलेली अनुवंशिकता वगैरे मुद्यामुळे या सार्‍या गोष्टींमधलं गांभीर्यच हरवून गेले आहे. मुळात कर्णबधिर असणं हा आताच्या घडीला त्याचा बाऊ करावा, असा प्रश्‍न नाही, त्यामुळे त्या सार्‍या प्रॉब्लेमभोवती फिरताना एकूणच त्या सार्‍या गोष्टी तितक्याशा आपल्याला स्पर्शून जात नाहीत किंवा तो प्रॉब्लेम जेवढा दिग्दर्शकाला मोठा वाटतो तेवढं त्याचं महत्त्व आपल्याला पटवून देण्यात ते यशस्वी झालेले नाहीत. मध्यंतरापूर्वीचा अन् नंतरचा सिनेमा असे सरळ दोन भाग पडतात, पण पहिला भाग काहीसा संथ…रेंगाळणारा वाटतो अन् दुसरा भाग त्या मानाने घडणार्‍या गोष्टींमुळे काहीसा प्रवाही वाटतो. रोबोसोबतचा बुद्धिबळाचा खेळ किंवा रोबोचे व्हिएफएक्स हे खरंच चांगले वठलेले भाग आहेत. उगाच त्याला नावं ठेवण्याजोगं नाही.

समीर धर्माधिकारी अन् इशा कोप्पीकर ही जोडी देखणी जोडी वाटत असली तरी अभिनय नावाची गोष्ट आहे अन् आपले प्रेक्षक चोखंदळ आहेत. जोडी उत्तम दिसत असली तरी तो इम्पॅक्ट नाही. हे मान्य करायलाच हवं. इशा कोप्पीकरसाठी अत्यंत उत्तम संधी असून तिला त्याचं सोनं करता आलं नाही, हे खेदानं सांगावं लागेल. कारण लेखकानं लिहून दिलेली वाक्य कोरड्या मनानं अन् उजळणी केल्यासारखं म्हटल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी फार निस्तेज वाटतात. त्या गोष्टीमधल्या इमोशनल कोशंटवर मात करणारी कास्टिंग असल्यासारखं काम इशाने केलं आहे. कर्णबधिर मुलीची व्यक्तिरेखा तेजश्री वालावलकरने केली आहे. तिने त्या व्यक्तिरेखेला न्याय देण्याचा केलेला प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. त्या कर्णबधिर मुलीने बुद्धिबळाच्या जोरावर जग जिंकावं असं वाटणारे तिचे तिरसट असणारे बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणून सुहास पळशीकरांनी साकारलेली व्यक्तिरेखा ही खूप जिवंत वाटते.

आपल्या चित्रपटाचा यूसपीच मारक ठरत असेल तर नेमकं काय होतं, याचं उदाहरण म्हणजे मात हा चित्रपट. ‘मात’ हे टायटल या चित्रपटाला खूप योग्य होतं, त्यातल्या कठीण परिस्थितीवरही मात करणं अन् एकूणच बुद्धिबळाच्या खेळातलं शह और मात… पण दुर्दैवाने त्यामध्ये उत्तम निर्मितीमूल्य असूनही आशया अभावी चित्रपट आपला प्रभाव रसिकांच्या मनावर पाडण्यात अपयशी ठरला आहे.

चित्रपट – मात
निर्मिती – मनाली मंगेश सावंत
दिग्दर्शक – मनोहर सरवणकर
संगीत – डॉ. सलील कुलकर्णी
कलाकार – ईशा कोप्पीकर, समीर धर्माधिकारी, तेजश्री वालावलकर

रेटिंग – * *

Leave a Comment