आप-कॉंग्रेस यांच्यात भांडवलदाराच्या मध्यस्थीने समेट – गडकरी

नवी दिल्ली – नवी दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पार्टीचे सरकार येऊ नये यासाठी एका बड्या भांडवलदाराने कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यात समझोता घडवून आणला असून भारतीय जनता पार्टीचा विरोध या एका मुद्यावर आम आदमी पार्टीला कॉंग्रेसने मदत केली आहे, असा आरोप भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी काल पत्रकारांशी बोलताना केला.

आम आदमी पार्टी हा पक्ष नक्षलवाद्यांसारखाच पक्ष आहे. पण नक्षलवादी हे डावे माओवादी आहेत, तर आम आदमी पार्टीचे नेते हे उजवे माओवादी आहेत. त्यांचा लोकशाहीवर विश्‍वास नाही, लोकशाही प्रक्रियेवर सुद्धा विश्‍वास नाही. सत्ता स्थापन करण्यासाठी कॉंग्रेससारख्या भ्रष्ट पक्षाचा हात हाती घेताना त्यांना संकोच वाटत नाही, अशी टीका गडकरी यांनी केली.

या दोन पक्षामध्ये झालेला समझोता कोणत्या उद्योगपतीने घडवून आणला, कोणाच्या माध्यमातून घडवून आणला, कोणत्या हॉटेलमध्ये त्यांची बोलणी झाली याचे सगळे तपशील आपल्याकडे असल्याचा दावा गडकरी यांनी केला.

Leave a Comment