पुन्हा उपोषण करण्याचा अण्णांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

राळेगण /पुणे – ग्रामसभांना बळकटी द्या आणि अधिकार्‍यांच्या बदल्या प्रकरणातील व त्या संदर्भातील कायदे योग्य तर्हेयने लागू करा अन्यथा मला पुन्हा उपोषण करावे लागेल असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.

अण्णा लिहितात समाजाच्या सर्व थरात भ्रष्टाचाराचे स्वरूप व्यापक असून त्यामुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे दुष्कर झाले आहे. राज्यातील जनतेने जन आंदोलनाच्या माध्यमातून ग्रामसभा सशक्त करणे, सरकारकडून महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडण्यात होत असलेला विलंब दूर करणे अधिकार्‍यांच्या बदल्या व नागरिक संहिता कायद्याची अम्मलबजावणी योग्य प्रकारे न केली जाणे या विरोधात आवाज उठविला होता.पण सरकारने आश्वासने देऊनही त्याची पूर्तता केली नाही हे अतिशय दुःखदायक आहे. या संबंधी कायदे चांगले असूनही त्याची अम्मलबजावणी न होणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे. ग्रामसभा या लोकसभा आणि विधानसभेच्या वर आहेत याची आठवण राज्य सरकारने ठेवली पाहिजे.

अधिकारी बदली नियम २००६ नुसार कोणत्याही अधिकार्‍यांची तीन वर्षे होण्यापूर्वी बदली होऊ शकत नाही. मात्र हा नियम राज्य शासनाने अधिकारी बदली विलंब अधिनियमात बदलला आहे. तो रद्द केला गेला तर राज्यभर पुन्हा आंदोलन छेडले जाईल असेही अण्णांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात बजावले असल्याचे समजते.

Leave a Comment