नवी दिल्ली- गुरूवार रात्रीपासून दिल्लीत सीएनजीच्या दरात प्रतिकिलो साडेचार रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यागमुळे याचा फटका सर्वासामांन्याना बसत आहे. या अचानक घेण्यात आलेल्या निर्णयामागे राजकीय हेतू असल्याची शंका आप पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. दिल्लीत गुरूवार रात्रीपासून सीएनजीच्या (नैसर्गिक वायू) दरात प्रतिकिलो साडेचार रुपयांची दरवाढ झाली असून ‘आम आदमी पक्षा’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
एकीकडे आगामी काळात दिल्लीत नवीन सरकार स्थापन होत असतानाच, सीएनजीच्या दरात वाढ करण्याची एवढी घाई का केली? असा प्रश्न विचारत केजरीवाल यांनी या निर्णयामागे राजकीय हेतू असल्याची शंका व्यक्त केली आहे. दिल्लीत ‘आम आदमी पक्षा’ने सरकार स्थापनेचा निर्णय घेतला. शनिवारी २८ डिसेंबर रोजी ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
दोनच दिवसांत नवे सरकार स्थापन होणार असताना अशी तत्काळ दरवाढ करण्याची गरज होती का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
दरम्यान, सीएनजीचा दर प्रतिकिलो ५० रुपये १० पैसे झाला असून येथील संतप्त रिक्षाचालकांनी सीएनजीच्या दरवाढीमुळे संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र केजरीवाल यांनी त्यांना आगामी काळात संपावर न जाण्याचे आवाहन केले आहे.