मुख्यमंत्री चव्हाण पुणे भेटीवर

पुणे – चार राज्यातील विधानसभा निवडणुकांत पराभवाची नामुष्की ओढविलेल्या काँग्रेसने महाराष्ट्रातील पक्ष कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे प्रयत्न सुरू केले असून त्या अंतर्गत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उद्या म्हणजे २८ डिसेंबरला पुण्यात येत आहेत. पुण्यात त्यांचे अनेक कार्यक्रम असून त्यात रॅलीजचाही समावेश आहे.

पुणे शहर काँग्रेस प्रमुख अभय छाजेड यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या काँग्रेसचा १२८ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त होणार्‍या रॅलीत मुख्यमंत्री सहभागी होणार आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांशी ते यावेळी संवाद साधणार आहेत तसेच राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असताना काँग्रेसने केलेली लोकविकासाची कामे जनतेपर्यंत कशी पोहोचवायची याचे मार्गदर्शनही करणार आहेत. या भेटीत मुख्य लक्ष युवकांवर केंद्रीत असले तरी ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठीही विशेष कार्यक्रम घेतले जाणार आहेत.

राज्यातील वरीष्ठ नेत्यांनी पुण्याचे खासदार व पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेले सुरेश कलमाडी याच्यापासून दूर राहण्याचा इशारा पक्ष कार्यकर्त्यांना दिला आहे असेही समजते. पुण्यातून लोकसभेसाठी इच्छुक असलेले मोहन जोशी, शरद रणपिसे यांनी आपल्यामागे कार्यकर्त्यांचे कसे बळ आहे याचे प्रदर्शन करण्याची तयारीही सुरू केली असून मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांपर्यंत ते पोहोचावे यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत असेही समजते.

दरम्यान सुरेश कलमाडी यांनी काँग्रेसच्याच तिकीटासाठी प्रयत्न सुरू ठेवला आहे आणि अलिकडच्या दिवसांत ते अनेक सार्वजनिक कार्यक्रमांत उपस्थितीही लावत आहेत. आपल्या खासदार फंडातून पुण्यासाठी केलेली कामे लोकांच्या नजरेपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

Leave a Comment