मनसेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचे निधन

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस अतुल सरपोतदार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने लीलावती रुग्णालयात गुरुवारी निधन झाले. ते ५१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी शिल्पा सरपोतदार, मुलगा जय असा परिवार आहे. सरपोतदार हे घरी असताना संध्याकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथेच त्यांचे निधन झाले. सरपोतदार हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्तीय होते. त्यांनी शिवसेनेत असताना राज यांच्यासोबत भारतीय विद्यार्थी सेनेचे काम केले.

अतुल सरपोतदार हे शिवसेना नेते मधुकर सरपोतदार यांचे पुत्र होत. मितभाषी असलेले अतुल संघटन बांधणीतील उत्तम संघटक म्हणून ओळखले जात. शिवसेनेत अंतर्गत वाद सुरू झाल्यानंतर मधुकर सरपोतदार उद्धव ठाकरे यांच्याबाजूने असताना अतुल यांनी मात्र कायम राज ठाकरे यांची पाठराखण केली. शिवसेनेत असताना विद्यार्थी सेनेच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. हॉटेल व्यावसायिक असल्यामुळे मराठी मुलांनी उद्योगामध्ये पुढे येण्यासाठीही त्यांच्याकडून विविध उपक्रम राबिवले जात होते. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्याबरोबर अतुलही बाहेर पडले होते.

राज यांचे कट्टर समर्थक अशीच त्यांची ओळख होती. त्यांच्यावर मनसेच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली होती, तर त्यांची पत्नी शिल्पा सरपोतदार यांच्यावर पक्षातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. त्या मुंबै बँकेवर संचालक म्हणून कार्यरत आहेत. राजकारणात एकदिलाने काम करणारे दाम्पत्य म्हणून या दोघांची ओळख होती.

अतुल यांच्या निधनाचे वृत्त समजताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तत्काळ लीलावती रुग्णालयात धाव घेतली. त्याचप्रमाणे मनसेसह वांद्रे परिसरातील शिवसेना; तसेच अन्य राजकीय पक्षांचे पदाधिकारी रुग्णालयाच्या परिसरात उपस्थित झाले होते. अतुल यांच्या निधनाने केवळ मुंबईतीलच नव्हे, तर राज्यभरातील मनसेच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला असून, एक मितभाषी संघटक हरवल्याची भावना व्यक्त होत आहे. उद्या सकाळी अकरा वाजता वांद्रे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अतुल यांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने शिल्पा सरपोतदार यांचा रक्तदाब वाढला. त्यांच्यावर लीलावतीमध्येच उपचार सुरू आहेत.

Leave a Comment