बोनमॅरो : क्षयरोगाच्या जंतूंचे आश्रयस्थान

मानवी इतिहासामध्ये अनेक प्रकारचे रोग आले आणि गेले. देवीचा रोग संपला, आता पोलिओ संपत आला. एडस् आला आणि त्यावर निर्बंध घालण्याच्या उपायांचा शोध लागल्यामुळे त्याची तीव्रता कमी झाली. परंतु मलेरिया आणि क्षयरोग हे असे दोन विकार आहेत की, ज्यांच्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवणे किंवा त्यांचे समूळ उच्चाटन करणे मानवाला अजून जमलेले नाही. त्यातल्या त्यात क्षयरोग म्हणजे टी.बी. याच्या बाबतीत तर जगातल्या अनेक तज्ज्ञांना हात टेकावे लागले आहेत. टी.बी. बरा होतो, परंतु ज्याच्या शरीरामध्ये टी.बी.च्या जंतूंनी शिरकाव केलेला असतो त्याच्या शरीरातून तो पूर्णत: हाकलला जात नाही. सध्या क्षयरोगावर डॉटस् नावाची औषध प्रणाली वापरली जाते. त्यामुळे क्षयरोग झालेला रुग्ण सहा महिन्यात बरा होतो.

या औषधाच्या पद्धतीत औषधे घेण्याच्या बाबतीत थोडीशीही धरसोड चालत नाही. म्हणून भारतात तरी ही औषधे क्षयरोग चिकित्सकाच्या नजरेसमोर घ्यावी लागतात. सहा महिन्यांनी सुद्धा रुग्ण बरा होतो, मात्र औषधे बंद केली की हा रोग पुन्हा उङ्गाळून येतो. या रोगाचे समूळ उच्चाटन का होऊ शकत नाही, यावर बर्‍याच दिवसांपासून संशोधन सुरू होेेते. औषधे चालू असेपर्यंत तो दबून राहतो हे खरे, परंतु तोपर्यंत तो कोठे लपून बसतो याविषयी प्रचंड उत्सुकता होती. डॉक्टर विपुल दास या भारतीय संशोधकाने अमेरिकेतल्या स्टॅन्ङ्गोर्ड विद्यापीठात यावर संशोधन केले आणि टी.बी.च्या जंतूचे आश्रयस्थान बोनमॅरोमध्ये आहे असे दाखवून दिले. टी.बी.चा जंतू बोनमॅरोत जाऊन बसतो आणि औषध योजना संपली की, पुन्हा हळू हळू कार्यरत होतो. हे विधान ङ्गार ढोबळ आहे.

नेमकेपणाने सांगायचे तर असे म्हणता येईल की, टी.बी.चे जंतू बोनमॅरोच्या स्टेमसेल्स्मध्ये लपून राहतात आणि त्यामुळे त्यांचे उच्चाटन होत नाही. टी.बी.वर म्हणून जी औषधे दिली जातात ती औषधे टी.बी.च्या लक्षणांवर लागू पडतात. परंतु ती बोनमॅरोपर्यंत पोचत नाहीत आणि बोनमॅरोच्या स्टेमसेल्स्मध्ये शिरकाव करू शकत नाहीत. तिथे ते सूप्त अवस्थेत राहतात. लक्षणांवर दिलेल्या औषधांमुळे लक्षणे सुधारतात. खोकला कमी होतो, ताप कमी होतो, अशक्तता जाणवत नाही असे सारे गुण यायला लागले की, पेशंट आणि डॉक्टर दोघांनाही आता तब्येत सुधारलीय असे वाटते आणि ते औषधे बंद करतात.

दरम्यानच्या काळात बोनमॅरोच्या स्टेमसेल्समध्ये लपून राहिलेला सूप्त अवस्थेतला जंतू पुन्हा कार्यरत होतो. डॉ. विपुल दास हे स्टॅन्ङ्गोर्ड विद्यापीठा मध्ये गेली १५ वर्षे संशोधन करत होते आणि टी.बी.च्या जंतूंचे आश्रयस्थान शोधण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना हा जंतू शेवटी त्या स्टेमसेल्समध्ये लपून रहात असल्याचे आढळले. या शोधामुळे आता टी.बी.ची औषध योजना पूर्णपणे बदलून जाणार आहे आणि या जंतूच्या या आश्रय स्थानापर्यंत जाऊन त्याच्यावर मारा करणारे औषध शोधले जाणार आहे. विपुल दास यांनी या जंतूंचे हे आश्रयस्थान शोधण्याबरोबरच अधिक प्रगत संशोधन केले आहे आणि स्टेमसेल्समध्ये लपून राहणारे हे जंतू शोधून, त्यांना वेगळे करून कसे नष्ट करता येईल यावरही संशोधन सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी अरुणाचल प्रदेशामध्ये वास्तव्य करणार्‍या इदू मिशिमी या जातीच्या लोकांवर प्रयोग केले.

इदू मिशिमी जातीमध्ये क्षय रोगाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे तिथे प्रयोग करून त्यांना बरेच काही निष्कर्ष काढता आले. शास्त्रज्ञांनी या संशोधनाची वाहवा केली असून त्यामुळे क्षयरोगावरील उपचाराच्या क्षेत्रात नवे पर्व सुरू होणार असल्याचे म्हटले आहे. क्षयरोगावर उपचार करणारे दिल्लीच्या लोकनायक हॉस्पिटलमधील डॉ. अश्‍विनी खन्ना यांनी, या संशोधनामुळे क्षयरोगाच्या उपचाराला नवी दिशा मिळेल आणि उपचाराची पद्धती पूर्ण बदलून जाईल, असे म्हटले आहे. आता रुग्णाच्या शरीरातील क्षयरोगाच्या जंतूंचे समूळ उच्चाटन करणे शक्य होईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment