गुरुजी तोल सांभाळा

माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे आणि मुलामुलींच्या हातात अल्पवयातच मोबाईल ङ्गोन आल्यामुळे मुले बिघडायला लागली आहेत. वयाच्या विशीनंतर त्यांना जे समजले पाहिजे ते त्यांना दहा बारा वर्षाचे असतानाच कळायला लागले आहे. परिणामी काही विपरीत घटना घडत आहेत. जुन्या पिढीच्या लोकांना अशा घटनांमुळे मोठे अस्वस्थ वाटायला लागले आहे. घरोघर आणि शाळाशाळांमध्ये संगणक, इंटरनेट याचा प्रसार झाल्यामुळे त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता बळावत चालली आहे. लोकांचा लैंगिक व्यवहाराबाबतचा संयम ढळत आहे. त्याला शाळेतले शिक्षकही अपवाद नाहीत. ते आपल्या विद्यार्थिनींकडे वाईट नजरेने बघायला लागले आहेत. कदाचित असे विधान एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याने केले असते तर त्याची वासलात अतिशयोक्तीपूर्ण विधान म्हणून केली गेली असती. परंतु शिक्षकांचे वर्तन बिघडत आहे ही गोष्ट राज्याच्या शिक्षण खात्यालाही डाचत आहे म्हणून शिक्षकांनी विद्यार्थिनीशी चांगली वागणूक ठेवावी असे आवाहन करणारे पत्रक उच्च शिक्षण संचालनालयाने काढले आहे. या पत्रकात तथ्य आहे. कारण देशाच्या कानाकोपर्‍यातून कुठून तरी रोज एखादी तरी अशी बातमी वाचण्यात येते की, एखादा शिक्षक आपल्या शाळेतल्या नुकत्याच वयात येत असलेल्या मुलींशी नको ते वर्तन करतो आणि अडचणीत येतो.

खरे म्हणजे मुले सुद्धा बिघडलेली आहेत. दिल्लीतल्या
एका शाळेतल्या शिक्षिकेने एक मोठी गंभीर तक्रार केली आहे. आपण शिकवत असलेल्या माध्यमिक शाळेतल्या वरच्या वर्गातील म्हणजे नववी ते बारावीच्या वर्गातील मुलांकडे सर्रास मोबाईल ङ्गोन असतात. या वर्गांमध्ये शिकवताना ङ्गळ्यावर काही तरी लिहिण्याच्या निमित्ताने शिक्षिकेची पाठ मुलांकडे वळली की, मुले आपल्या खिशातील मोबाईल सरसावतात आणि शिक्षिकेचे पाठमोरे ङ्गोटो घ्यायला लागतात. अतीशय चिंता वाटावी असे हे वातावरण आहे. ज्यामध्ये सुसंस्काराचा पूर्णपणे लोप झाला आहे. आपली शिक्षिका ही आईसारखीच असते. मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्य देवो भव असे म्हणण्याची आपल्यात परंपरा आहे. परंतु ज्या शिक्षिकेला आपण देव मानले पाहिजे तिचे असे ङ्गोटो काढणे हे पाप आहे याची यत्किंचितही जाणीव मुलांमध्ये राहिलेली नाही. महाराष्ट्रातल्या काही शाळांमध्ये नुकत्याच वयात येऊ घातलेल्या मुलींनी आपले शिक्षक आपल्याशी गैरवर्तणूक करतात अशा तक्रारी केलेल्या आहेत.

या शाळांतल्या मुलींनी अशा शिक्षकांच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी धैर्य एकवटले म्हणून त्यांच्या तक्रारी पुढे तरी आल्या. परंतु अशा किती तरी शाळा असतील की, ज्यातील शिक्षक मुला-मुलींशी असे वर्तन करत असतील, पण मुली त्या वर्तनावर मौन पाळत असतील. अशा सगळ्या शिक्षकांसाठी महाराष्ट्र सरकारच्या उच्च शिक्षण संचालनालयाने हा ङ्गतवा जाहीर केला आहे. शाळेतल्या मुली शिक्षकांसाठी त्यांच्या मुलीसारख्या असतात. परंतु याचे भान काही शिक्षकांना रहात नाही आणि अशा काही तक्रारी पुढे आल्या आहेत. म्हणूनच शिक्षण खात्याने हा ङ्गतवा जारी केला आहे. एवढेच नव्हे तर अशा शिक्षकांना नोकरीवर घेताना आपण विद्यार्थिनींशी चांगली वर्तणूक ठेऊ असे लेखी हमीपत्र घ्यावे, असेही उच्च शिक्षण संचालनालयाने आपल्या पत्रकात म्हटले आहे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते पवित्र असते, ही गोष्ट शिक्षकांच्या कायम लक्षात रहावी म्हणून ही उपाययोजना आहे. काही शिक्षकांना या नात्याचा विसर पडत आहे म्हणून सरकारला ही उपाययोजना करणे भाग पडलेले आहे. तेव्हा शिक्षकांना संताप येण्याआधी वस्तुस्थितीचा विचार करावा लागणार आहे. शिक्षण विभागाच्या या ङ्गतव्याची शाई वाळते ना वाळते तोच लातूर जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या गैरवर्तनाचा एक नवा किस्सा समोर आला आहे. या जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा या गावी जिल्हा परिषदेच्या शाळेतील आठवीच्या वर्गातील विद्यार्थिनींसमोर एका शिक्षकाने संगणकावर अश्‍लील चित्रङ्गीत उघड केली.

मुलींनी ही तक्रार आपल्या घरी जाऊन सांगितली आणि गावकर्‍यांनी सदर शिक्षकाला चोपून काढले. या प्रकरणातला दोषी शिक्षक हा काही मुलींना शिकवत नव्हता. मुलींना दुसरेच शिक्षक संगणक दाखवत होते त्यावेळी हे पराक्रमी शिक्षक एक पेन ड्राईव्ह घेऊन त्याच प्रयोगशाळेत आले. मुली आपापला संगणक बघण्यात दंग असतानाच त्यातल्या काही मुलींच्या असे लक्षात आले की, हे दुसरे शिक्षक आपल्या संगणकावर जे काही उघडे करून बघत आहेत ते आक्षेपार्ह आहे. त्यामुळे मुलीत कुजबूज सुरू झाली आणि ही गोष्ट पहिल्या शिक्षकाच्या लक्षात आली. त्यांनी त्या उपद्व्यापी शिक्षकाला संगणक ताबडतोब बंद करण्यास ङ्गर्मावले, पण त्याला ते जमेना. त्यामुळे पहिल्या शिक्षकाने ताबडतोबीने तो संगणक बंद केला. दरम्यान दोन-पाच मिनिटे मुलींनी जे पाहिले होते त्यामुळे त्या हादरल्या होत्या. हा सगळा प्रकार पाहिला म्हणजे त्या शिक्षकाची कमाल वाटते. आपल्या पेन ड्राईव्हमध्ये त्यांनी अशी चित्रे आणावीत हीच गोष्ट मुळात शिक्षकी पेशाला काळीमा लावणारी आहेत. मग पुढचा प्रकार तर निंदा करण्याच्या पलीकडचा आहे. शिक्षकांना आपल्या जबाबदारीच्या जाणीवेचे भान राहिलेले नाही. मुलांवर चांगले संस्कार करणे हे आपले कर्तव्य आहे हे त्यांना लक्षातच राहिनासे झाले आहे.

Leave a Comment