अंतर्गत संघर्ष कधी थांबणार?

आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातले कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकार कितपत यश मिळवू शकेल याविषयी शंका व्यक्त केल्या जात आहेत. महाराष्ट्रात आम आदमी पार्टी नाहीच. शिवसेना आणि भाजपाचा ङ्गारसा प्रभाव नाही त्यामुळे या आघाडीचे नेते निश्‍चिंत असले तरी त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की त्यांच्या पराभवासाठी बाहेरून कोणीही प्रयत्न करण्याची गरज नाही. त्यांचा पराभव करण्यास त्यांचे आपापसातले झगडे पुरेसे समर्थ आहेत. महाराष्ट्रात कोणत्याच लाटेचा परिणाम होण्याची शक्यता पवार आणि चव्हाण यांना वाटत नाही असे दिसते. तशी ती वाटली असती तर गेल्या दहा वर्षापासून या दोन पक्षांमध्ये एकत्र सरकार असूनही जो सततचा कलगीतुरा सुरू आहे तो थांबवण्याचा प्रयत्न त्यांनी केला असता. उलट निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे त्यांच्यातले सवाल जवाब अधिक तीव्र होत चालले आहेत. दोन्ही पक्ष पंधरा वर्षापासून एकत्र आलेले आहेत आणि त्यांच्यात आपापल्या प्रतिमा उजळ करून घेण्यासाठी सतत स्पर्धा सुरू आहे. एखाद्या विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर सातत्याने टीका करत रहावी तसे या दोन मित्र पक्षांचे नेते परस्परांना सतत बोचकरे आणि ओरखडे काढत आहेत.

आजपासून चार दिवसांनी सुरू होणारे २०१४ हे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे. तेव्हा निवडणुकीच्या मैदानात उतरताना तरी ऐक्याचे प्रदर्शन घडवावे असे त्यांना वाटत नाही आणि त्यांची आपापसातली टीका निवडणुका जवळ येत आहेत तसतशी अधिक विषारी व्हायला लागली आहे. आदर्श गृहनिर्माण घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमलेल्या न्यायमूर्ती जे.ए.पाटील यांच्या आयोगाने राज्यातल्या चार मुख्यमंत्र्यांना आणि काही अधिकार्‍यांना दोषी धरले असले तरी या चौकशीचा अहवाल मुख्यमंत्र्यांनी ङ्गेटाळला. त्यावरून कॉंगे्रस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात हमरीतुमरी सुरू झाली आहे. आपचा प्रभाव महाराष्ट्रात पडणार नाही, मोदी लाट महाराष्ट्रात येणार नाही आणि भाजपा-सेना युतीचा महाराष्ट्रात काही जोरच नाही. असे या नेत्यांना वाटते आणि मर्यादित अर्थाने ते खरेही आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या सरकारला भाजपा-सेना युतीपासून किंवा आप पार्टीपासून धोका नाही. परंतु त्यांच्या आपापसातल्या भांडणामुळे मात्र दोन्ही पक्षांना बरेच नुकसान सहन करावे लागणार आहे. आदर्श प्रकरणात पृथ्वीराज चव्हाण यांच्या शुभ्र सदर्‍यावर काही काळे डाग पडले. त्यामुळे केवळ पृथ्वीराज चव्हाण यांचीच प्रतिमा खराब झाली असे नाही तर राहुल गांधी यांच्याही प्रतिमेचा प्रश्‍न निर्माण झाला. तेव्हा हा अहवाल कोणी ङ्गेटाळला याची जबाबदारी एकमेकांवर ढकलायला सुरूवात झाली.

हा अहवाल राज्य मंत्रीमंडळाने ङ्गेटाळला असला तरी त्यामुळे उडालेले शिंतोडे आपल्या आधीच घाण झालेल्या शर्टावर पडू नयेत म्हणून अजित पवार काल पुढे आले. हा अहवाल मंत्रिमंडळाने नव्हे तर मुख्यमंत्र्यांनी ङ्गेटाळला आहे असे सांगून त्यांनी आदर्श प्रकरणापासून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांची या सगळ्या प्रकारात गोची झाली आहे. अशोक चव्हाण यांना वाचवण्याचा हा निर्णय त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरूनच घेतला असेल यात काही शंका नाही. परंतु दिल्लीत बसलेल्या कॉंग्रेसश्रेष्ठी नावाच्या चौकडीच्याच मनात प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री मोठ्या पेचात सापडले आहेत. यामुळे राहुल गांधी यांची प्रतिमा खराब होऊ नये म्हणून खासदार मिलिंद देवरा पुढे आले आणि त्यांनी हा अहवाल ङ्गेटाळायला नको होता असे प्रतिपादन केले. आदर्श ही इमारत बेकायदा बांधलेली आहे त्यामुळे या बेकायदा व्यवहारात ज्यांचे हात गुंतले असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे असे देवरा म्हणाले. त्यांचा बोलविता धनी नेमका कोण आहे याचा काही पत्ता लागत नाही. पण ते अशा प्रकारचे प्रतिपादन अन्य कोणाच्या तरी इशार्‍यावरून करत आहेत. याविषयी शंका बाळगायचे कारण नाही. कारण आदर्श इमारतीतला भ्रष्टाचार खपवून घेता कामा नये असा सल्ला देणार्‍या मिलिंद देवरा यांनी आपल्या मतदार संघामधल्या कॅम्पाकोला इमारतीच्याबाबतीत मात्र नेमका उलटा पवित्रा घेतला होता.

आदर्शमधला भ्रष्टाचार खपवून घेऊ नये असा आग्रह धरणार्‍या देवरा यांनी कॅम्पाकोलातला बेकायदा व्यवहार मात्र खपवून घ्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांसमोर आग्रह धरला होता. कारण कॅम्पाकोलातले रहिवाशी हे त्यांचे मतदार आहेत. कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मनामेंदूमध्ये किती गोंधळ माजलेला आहे हे यावरून स्पष्ट होते. मात्र या गांेंधळात पृथ्वीराज चव्हाण यांना आपला सदरा स्वच्छ ठेवायचा आहे आणि त्यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न चाललेला आहे. याउलट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते मुख्यमंत्र्यांच्या सदर्‍यावर चारदोन तरी शिंतोडे उडलेले असावेत आणि त्यांचा सदरा आपल्यासारखाच व्हावा यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत आहेत. मंत्र्यांच्या सरकारी बंगल्यावर नेमका किती खर्च केला जातो आणि त्यासाठी जनतेचा पैसा कसा वारेमापपणे उधळला जातो याची माहिती बाहेर येत आहे आणि तिच्या बाहेर येण्यातूनसुध्दा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या संघर्षातून ती बाहेर येत आहे की काय असे वाटावे एवढे राज्यातले वातावरण या दोन पक्षातल्या चढाओढीमुळे मलीन झाले आहे.

Leave a Comment