पाटणा – बिहारमधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार हे राज्यातल्या कायदा-सुव्यवस्था स्थितीवर लक्ष ठेवण्याऐवजी राजकीय घटनांकडे जास्त लक्ष देत आहेत, अशी टीका भारतीय जनता पार्टीने केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी पत्रकारांशी बोलताना हा आरोप केला.
दरम्यान, बिहारमधील अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वेगाने वाढ होत असून श्रीमंत लोकांना पळवून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचा धंदा पुन्हा तेजीत यायला लागला आहे. लालूप्रसाद यादव मुख्यमंत्री असताना अपहरणकर्ते मुजोर झाले होते. त्यांच्यावर नितीशकुमार यांनी बरेच नियंत्रण ठेवले, परंतु आता हे गुन्हेगार पुन्हा एकदा कार्यरत होत आहेत.
बिहारच्या शिओहार जिल्ह्यामध्ये दोनच दिवसांपूर्वी सुशील गुप्ता या व्यापार्याला पळवून नेण्यात आले आणि त्याच्याकडून खंडणी घेण्यात आली. गुजराती उद्योगपती महमद सोहेल हिंगोरा यालाही दमण राज्यातून पळवून आणून बिहारच्या सरंग जिल्ह्यात ठेवले. त्याच्या वडिलांनी २५ कोटी रुपयांची खंडणी दिल्यानंतर त्याची सुटका झाली. विशेष म्हणजे या व्यापार्याची ही विक्रमी खंडणी ठरविण्यासाठी मध्यस्थी करण्याच्या कामात सत्ताधारी पक्षाचेच काही कार्यकर्ते गुंतले होते. या संबंधात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.