इस्लामाबाद – पाकिस्तान निवडणूक आयोगाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार पंतप्रधान नवाझ शरीफ सर्वाधिक श्रीमंत राजकारणी लोकप्रतिनिधी ठरले आहेत. शरीफ यांची संपत्ती आहे १.४३ अब्ज डॉलर्स. पाकिस्तानात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची संपत्ती लाखापासून ते अब्ज डॉलर्स पर्यंत आहे आणि त्यातील अनेकजण कारखानदार, जमीनदार आणि व्यापारी आहेत.
नवाझ शरीफ पाकमधील सर्वाधिक श्रीमंत खासदार
नवाझ शरीफ यांच्या संपत्तीत कोट्यावधी रूपये किमतीची शेतजमीन, सहा विविध कारखान्यांतील गुंतवणूक, सात बँकात १२ कोटी ६० लाखांची कॅश अशी संपत्ती असून त्यांच्याकडे टोयाटो लँड क्रूझर व दोन मर्सिडीज गाड्या आहेत. शरीफ यांच्या पत्नीकडे १५ लाख रूपये किमतीचे दागिने आहेत. तहरीक ए इन्साफ पक्षाचा संस्थापक व माजी क्रिकेटपटू इम्रानखान यांच्या संपत्तीत मात्र यंदाच्या वर्षात पाच लाख रूपयांनी घट झाली आहे असेही या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
इम्रानखान यांच्याकडे २.९६ कोटींची संपत्ती असून त्यात १४ विविध ठिकाणच्या मालमत्तांचा समावेश आहे. त्यापैकी आठ मालमत्ता त्यांना वारसा हक्काने तर दोन मालमत्ता भेट म्हणून मिळाल्या आहेत. त्यांच्या बँकेत १.३६ कोटींची कॅश आहे व पन्नास लाख रूपये किमतीची टोयाटो प्राडो कार त्यांच्या मालकीची आहे.