सत्तारूढ कम्युनिस्ट पाटीने भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्यासाठी ज्या अनेक योजना हाती घेतल्या आहेत त्यातील एका नुसार सरकारी अधिकार्याना खासगी क्लबमध्ये जाण्यास बंदी करण्यात आली आहे. या क्लबांचा उपयोग प्रामुख्याने बेकायदेशीर धंदे करण्यासाठी आणि लैगिक कारणांसाठी केला जात असल्याने ही बंदी आणल्याचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी जाहीर केले आहे.
शी जिनपिंग यांनी सत्तेवर आल्यापासून भ्रष्टाचार निर्मूलनासाठी व्यापक निती अमलात आणली आहे. चीनमध्ये अनेक कनिष्ठ आणि वरीष्ठही भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून कायद्याच्या कचाट्यात येत आहेत. हे असेच सुरू राहिले तर कम्युनिस्ट पार्टीची सत्ता चीनमधून जाण्यासाठी कांही वेळ लागणार नाही याची जाणीव जिंनपिग यांना झाली आहे. परिणामी अशा अधिकार्यावर वेळीच कारवाई करणे गरजेचे बनले आहे.
जिनपिंग यानी सत्तेवर येताच मेजवान्यापासून ते अंतिम संस्कारांपर्यंत सर्व ठिकाणी करण्यात येणार्या अनावश्यक खर्चावर बंधने आणली असून ती मोडणार्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पाठोपाठच आता खासगी क्लबमध्ये जाण्यावरही बंधने आली आहेत. चीनच्या बड्या शहरांमधून अशा खासगी कलबचे मोठे जाळेच पसरले आहे. मात्र तेथे जाणार्या सरकारी अधिकार्याना कडक शिक्षा सुनावली जाणार आहे.