एक निरर्थक समझोता

आपण सध्या समाजासमोरचे खरे प्रश्‍न विसरून चाललो आहोत आणि नको त्या प्रश्‍नांना नको ऐवढे महत्त्व द्यायला लागलो आहोत असे काही वेळ वाटते. राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांचे मनोमीलन आणि त्याला दिले गेलेले अवास्तव महत्त्व पाहिले म्हणजे आपण खरोखर कोठे चाललो आहोत असा प्रश्‍न मनाला सतवायला लागतो. या दोघांत हातमिळवणी झाली हे ठिकच झाले पण त्या हातमिळवणीचा समाजाला काय ङ्गायदा झाला? राज ठाकरे यांनी गेल्या पाच-सात वर्षात हिंदी भाषिकांविरुध्द द्वेष पसरविण्याचाच उद्योग केला आणि आज एका हिंदी भाषकाशी हातमिळवणी केली. ती करताना त्यांना कमीपणा वाटला नाही. पण मराठी माणसाच्या खर्‍या हितासाठी शिवसेनेशी हातमिळवणी करण्यास मात्र त्यांना कमीपणा वाटत आहे. अशा लोकांना घरच्यांचे काळ असे म्हणतात. २००८ साली अमिताभ बच्चन यांची अभिनेत्री कम राजकारणी पत्नी खासदार जया बच्चन एका खाजगी कार्यक्रमात, हम हिंदी मे बोलेंगे क्योंकी हम युपीवाले है. महाराष्ट्रके लोक हमे माङ्ग करे. असे उद्गार काढले होते. हा कार्यक्रम द्रोन या चित्रपटाच्या संदर्भात होता आणि त्यातले कलाकार इंग्लिशमध्ये बोलत होते. जया बच्चन यांना आपण इंग्रजी बोलणार नाही असे म्हणायचे होते.

महाराष्ट्रके लोग हमे माङ्ग करे हे वाक्य त्यांनी उच्चारले नसते तरी चालले असते. परंतु काहीतरी निमित्त काढून आंदोलन करायला टपलेल्या कार्यकर्त्यांना असली वाक्ये सोयीची होतात. मनसेचे तसेच झाले. त्यांनी या एका वाक्यावरून मुंबईत आंदोलन सुरू केले. शेवटी अमिताभ बच्चन यांनी माङ्गी मागितली आणि या प्रकरणावर पडदा पडला. या घटनेला पाच वर्षे होऊन गेली. पण मध्यंतरीच्या काळात या घटनेचे, त्यानंतरच्या आंदोलनाचे किंवा बच्चन आणि राज यांच्यातल्या कथित कटुतेचे कसलेही पडसाद उमटले नाहीत. त्यामुळे पाच वर्षानंतर एका व्यासपीठावर येणे याला काही महत्त्व राहिलेले नव्हते. परंतु राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन एका व्यासपीठावर आले आणि यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी झाले गेले गंगेला मिळाले असे उद्गार काढले. या गोष्टीला माध्यमांमध्ये अवाजवी प्रसिध्दी देण्यात आली. पाच वर्षामध्ये या दोघांतले वितुष्ट वाढत गेले असते किंवा दोघांमध्ये काही संघर्ष निर्माण झाला असता तर आत्ता त्यांच्या एकत्र येण्याला काहीतरी महत्त्व होते. पण २००८ साली घडलेली घटना आणि नंतर अमिताभ बच्चन यांनी माङ्गी मागणे या प्रकारानंतरच सारे गंगेला मिळाले होते. मग पुन्हा एकदा या गंगार्पणाला शिळ्या कढीला आणावा तसा ऊत का आणला गेला. याचा काही खुलासा झालाच नाही.

या दोघांतले वितुष्ट आहे तसेच राहिले असते तरी समाजाला काय ङ्गरक पडणार होता? या दोघांतले वितुष्ट किंवा मतभेद समाजाच्या खर्‍या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नाबाबत असते, अन्न सुरक्षेसारख्या एखाद्या पोटापाण्याच्या विषयाशी संबंधित असते किंवा देशाच्या दृष्टीने एखाद्या दृष्टिकोनाच्या बाबतीत असते तर त्याला काही प्रमाणात महत्त्व होते. ङ्गारच खोलात जाऊन विचार करायचा तर तसे मुलभूत वैचारिक मतभेद असते तरीही त्याला महत्त्व नव्हते. कारण शेवटी राज ठाकरे आणि अमिताभ बच्चन यांचे या समाजातले नेमके स्थान काय आहे आणि समाजावर त्यांच्या सामाजिक दृष्टिकोनाचा प्रभाव तरी काय आहे? जया बच्चन यांनी सहजपणे उच्चारलेले एक वाक्य त्यावरून एवढा मोठा गहजब उभा करणे हे सगळे प्रकार पाहिले म्हणजे त्यांना समाजातल्या खर्‍या प्रश्‍नांची जाणीव कशी नाही हे लक्षात येते. जया बच्चन यांनी हम हिंदी बोलेंगे असे म्हटल्याचा राज ठाकरेंना एवढा राग आला पण आता मात्र त्यांनी अमिताभ बच्चन यांच्या हिंदी भाषेची प्रशंसा केली किंबहुना आपण तशी हिंदी शिकणार आहोत असेही म्हटले. याचा अर्थ राज ठाकरे यांना अजूनही नीट हिंदी येत नाही असा होतो. पण आता त्यांना हिंदी भाषेची प्रशंसा करताना मराठी भाषेचा अपमान होतोय असे वाटत नाही. २००८ साली तसे वाटत होते. यातून राज ठाकरे यांचा वैचारिक प्रवास आणि पक्षाच्या उभारणीची तत्त्वे यांच्या बाबतीतली अपरिपक्वता लक्षात येते.

ही सभा, त्यातली भाषणे आणि त्याला दिले गेलेले अवाजवी महत्त्व या गोष्टी तर आश्‍चर्य वाटावे अशा आहेतच पण त्यापेक्षाही अधिक आश्‍चर्यजनक आहे ती अबु आजमी यांची प्रतिक्रिया. अमिताभ बच्चन यांनी राज ठाकरे बरोबर एका व्यासपीठावर बसावे ही त्यांनी उत्तर भारतीय लोकांशी केलेली बेईमानी आहे असे अबु आजमी यांनी म्हटले आहे. आता या मुंबईतला कोणी भैय्या माणूस अमिताभजींना जवळ करणार नाही असेही त्यांनी बजावले आहे. राजकीय पुढार्‍यांच्या विचारांची दिशा कशी धोकादायक असते हे अबु आजमी यांच्या या उद्गारावरून दिसते. अमिताभ बच्चन यांनी ज्या मुंबईत येऊन नशीब काढले, करिअर केले त्या मुंबईत त्यांनी उत्तर भारतीय म्हणून आपली वेगळी राहुटी ठोकली पाहिजे असे आजमी यांना म्हणायचे आहे. या निमित्ताने मनसेसारख्या मराठीवादी पक्षाशी कधी वैर आलेच तर ते वैर कायम वाढवत नेले पाहिजे आणि मुंबईतल्या मराठी विरुध्द मराठेतर असे शत्रुत्त्व कायम टिकवले पाहिजे. म्हणजे अबु आजमींसारख्या अवसरवादी नेत्यांना आपल्या मतांच्या झोळ्या भरणे सोपे जाते. म्हणूनच अमिताभ बच्चननी राज ठाकरेसमोर मैत्रीचा हात पुढे केला की अबु आजमीच्या तळपायाची आग मस्तकाला जाते.

Leave a Comment